पोफाळी : अंगणवाडी सेविकेवर कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील तरोडा येथे सकाळी १० वाजता घडली. वृत्तलिहेस्तोवर पोफाळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने आरोपीचे नाव आणि कारण कळू शकले नाही. सुनंदा विजय धबाले (४५) रा. तरोडा असे हत्या झालेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. विधवा असलेली अंगणवाडी सेविका नेहमीप्रमाणे शुक्रवारी आपल्या घरी होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप घाव घातले. यात ती गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी नांदेडला नेण्यात येत होते. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. जुन्या वादातून जवळच्या नातेवाईकानेच तिची हत्या केल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी पोफाळी पोलिसांशी संपर्क साधला असता अद्याप तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एक पोलीस कर्मचारी शवविच्छेदनासाठी पाठविल्याची माहिती दिली. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी तक्रार दाखल झाली नव्हती. तक्रार दाखल नसल्याने आरोपीचे नाव आणि हत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही. सायंकाळी पोफाळी ठाण्याचे कर्मचारी तरोडा येथे घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. तक्रार दिल्यानंतरच या हत्येचे कारण कळणार आहे. सुनंदा धबाले यांचा मुलगा पुणे येथे सैन्याचे प्रशिक्षण घेत असून ती आपल्या घरी एकट्याच राहत होती. घटनेनंतर अनेकांनी तिच्या घराकडे धाव घेतली. (वार्ताहर)
अंगणवाडी सेविकेची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या
By admin | Updated: May 2, 2015 01:56 IST