सहा जखमी : पिंपळाच्या झाडाला धडक यवतमाळ : सुटी झालेल्या रुग्णाला घरी घेऊन जाणारी रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन एका पिंपळाच्या झाडावर आदळली. त्यावेळी या झाडाखाली बसलेला ७० वर्षीय वृद्ध चिरडून जागीच ठार झाला. तर रुग्णवाहिका झाडावर आदळल्याने रुग्णासह सहा जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता येथील पांढरकवडा मार्गावरील शारदा चौकात घडली. बापूराव पांडुरंग वाटोळेकर (७०) रा. महंमदपूर ता. बाभूळगाव असे मृताचे नाव आहे. तर रुग्णवाहिकेतील प्रभाकर महाजन (६८), प्रवीण महाजन , लता महाजन, सतीश महाजन सर्व रा. सुकळी ता. आर्णी, सुधाकर काशीनाथ मेश्राम (५५) रा. पिंपळगाव आणि गजानन खडसे रा. वर्धा अशी जखमींची नावे आहेत. सावंगी मेघे येथील ग्रामीण रुग्णालयातून सुटी झालेला रुग्ण घेऊन रुग्णवाहिका क्र. एम.एच.४९-सी-४१ सुकळीकडे जात होती. त्यावेळी येथील शारदा चौकात रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन पिंपळाच्या झाडावर आदळली. त्यावेळी या झाडाखाली बसलेले बापूराव वाटोळकर चिरडून जागीच ठार झाले. तर त्यांचा एक सहकारी जखमी झाला. या प्रकरणी अंबादास गाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक नितीन हनुमंता परताके रा. झाडगाव याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (कार्यालय प्रतिनिधी)
रुग्णवाहिकेने शारदा चौकात वृद्धाला चिरडले
By admin | Updated: January 28, 2017 02:21 IST