यवतमाळ : चारगाव चौकी येथील शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक देऊन गावात दारूबंदीची मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली असून या जिल्ह्यालगतच वणी तालुका आहे. चारगाव चौकी चंद्रपूरकरांना अतिशय जवळचे गाव आहे. त्यामुळे चंद्रपुरातील मद्यशौकीन चारगावात मोठ्या प्रमाणात येत आहेत. वच्छ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावाला निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात आज दोन वाईन शॉप व देशी दारुचा एक अड्डा आहे. पहाटे ४ वाजतापासून गर्दी जमत आहे. सर्व २९० महिलांनी एकत्र येऊन मतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे केली आहे. २०६ महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर करून मतदान घेऊन वाईन शॉप व दारू अड्ड्याला सिल लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदन देतेवेळी दारुबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाच्या संगीता पवार, उमेश मेश्राम, विद्या जुनगरी, कार्लीच्या सरपंच वैशाली अंजीकर, पूजा फुसाटे, मिना नांदेकर, शारदा बल्की, लता थेरे, शोभा दानव, सिंधू गिरटकर, मंगला नंदगीरवार, विलास बोदाडकर, राजू बोदाडकर, गजानन वाभीटकर, विलास खुसपुरे, राजू डावले, सुनील पिदूरकर, गोदावरी ढुमणे आदींसह महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
चारगाव येथे दारुबंदीसाठी एल्गार
By admin | Updated: December 22, 2015 04:00 IST