काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकांची निवड पुसद : नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक डॉ. अकिल मेमन यांची गुरूवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादीचे निशांत बयास, काँग्रेसचे डॉ. मो. नदीम आणि भाजपाचे धनंजय अत्रे यांची निवड करण्यात आली. पुसद नगरपरिषदेच्या २९ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी १२, भाजपा १०, शिवसेना चार, काँग्रेस तीन असे संख्या बळ आहे. कुणालाही बहुमत नसल्याने त्रिशंकु अवस्था होती. अखेर राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी केली आणि तिढा सुटला. गुरूवारी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या अध्यक्षतेत सर्वसाधारण सभा घेण्यात आली. दुपारी ११ ते १२ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यावेळी राष्ट्रवादीचे डॉ. अकिल मेमन यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे दुपारी नगराध्यक्ष अनिता नाईक यांनी डॉ. मेमन यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा केली. स्वीकृत सदस्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यां कडे यापूर्वीच नामांकन दाखल होते. आज अर्जाची छाणनी झाली. संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला दोन तर भाजपाला एक नगरसेवक पद प्राप्त झाले. यात राष्ट्रवादीचे वॉर्ड क्रमांक ५ मधून पराभूत उमेदवार निशांत बयास तर काँग्रेसचे वॉर्ड सहा मधील पराभूत उमेदवार डॉ. मो. नदीम आणि भाजपातर्फे धनंजय अत्रे यांची निवड झाल्याचे अनिताताई नाईक यांनी जाहीर केले. तर शिवसेनेचे नगरसेवक अॅड़ उमाकांत पापीनवार यांनी शिवसेनेला एक स्वीकृत नगरसेवक देण्याची मागणी केली. मात्र संख्याबळाअभावी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक पद यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले असल्याचे मुख्याधिकारी अजय कुरवाळे यांनी सांगितले. यावेळी प्रशासन अधिकारी उत्तमराव डुकरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडणुकीनंतर गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य पुसदकरांसोबतच नगरसेवकांमध्ये उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांबाबत उत्सुकता लागलेली होती. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद साजरा केला. (लोकमत चमू)
पुसदच्या उपाध्यक्षपदी अकिल मेमन
By admin | Updated: January 6, 2017 02:01 IST