पालकमंत्र्यांची ग्वाही : मुंबईच्या अधिकाऱ्यांची यवतमाळात बैठकयवतमाळ : सततच्या खंडित वीज पुरवठ्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले असून वीज वितरण कंपनीविरोधात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन रोष व्यक्त करीत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी यवतमाळात मुंबईच्या अधिकाऱ्यांना बोलावून पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. यात कृषिपंपांना सहा तास अखंड वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, महावितरणचे मुंबई येथील कार्यकारी संचालक दिनेश साबू, महापारेषणचे संचालक (संचलन) एम्पाल, मुख्य अभियंता सुहास रंगारी, महापारेषणचे मुख्य अभियंता एस.जे. पाटील, अधीक्षक अभियंता विजय भटकर, महापारेषणचे अधीक्षक अभियंता बी.पी. अवघड उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने कृषिपंपांच्या वीज पुरवठ्यावर चर्चा करण्यात आली. वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यासाठी दोन दिवसात तीन बैठकीही घेण्यात आल्या. त्यानुसार आता कृषिपंपांना सहा तास अखंड वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी सुधारित ३ फेज उपलब्धता कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यानुसार ३७ कृषी वाहिन्यांची चार समान गटात विभागणी करून चक्राकार पद्धतीने सहा तास अखंडित वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे २५ ते ३० मेगावॅटचा भार कमी होऊन आपदकालीन भारनियमन कमी होण्यास मदत होणार आहे. अतिउच्चदाब वाहिन्यांच्या विद्युत भाराचे विश्लेषण करून वर्धा-यवतमाळ-पुसद या २०० केव्ही लाईनचा विद्युत भार २५ ते ३० मेगावॅटने कमी करून उच्चदाब वाहिनीवर वळता केला आहे. या वाहिन्यांवरील विद्युत भार नियंत्रणात ठेऊन आपातकालीन भारनियमन होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे या बैठकीत ठरले. या निर्णयाची बुधवारपासूनच अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच कृषी पंपाच्या वीज जोडण्या मार्ग अखेरपूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे. सौर कृषिपंपाबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिकासाठी सौर पंप लावण्याची सूचना यावेळी देण्यात आली. (नगर प्रतिनिधी)
कृषिपंपांना सहा तास अखंड वीज
By admin | Updated: October 29, 2015 02:49 IST