राळेगाव : तालुक्यातील धानोरा आणि येवती ग्रामपंचायत कार्यालयात कृषी जागृती सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर लाभले होते. रोजगार हमी योजनेच्या कामातून शेती विकासाची विविध कामे, शेततळे, बांधबंदिस्ती, विहिरी, जलसंधारणाची कामे करा. त्यातून भूजलपातळी, सिंचन वाढल्यास आपली कृषीतून समृद्धी येईल, असे यावेळी गायनर म्हणाले. याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी आपल्या घरासोबत, आपला परिसर, घराजवळील नाल्या स्वच्छ ठेवाव्यात. केवळ ग्रामपंचायतीवर विसंबून राहू नये. ग्रामपंचायतीचा कर, पाणीपट्टी नियमित द्यावी. गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी गावविकासाचे नियोजन करावे. शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी नागरिकांनी आरओ प्लान्टची स्थापना करावी, असा मंत्र उपस्थितांना यावेळी देण्यात आला. धानोरा येथील कार्यक्रमाला सरपंच सारिका ढोले, माजी उपसभापती श्यामकांत येणुरकर, पोलीस पाटील दशरथ कामडी, शेतकरी उपस्थित होते. कृषी सेवक कुमरे, ग्रामसचिव पी.वाय. वाघ यांनी सहकार्य केले. येवती येथे उपसरपंच किशोर वाघ, पोलीस पाटील संतोष पारधी, ग्रामसचिव एस.जी. उम्रतकर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशव्दारा समोरील पाण्याचे डबके दोन दिवसात मुरूम टाकूण बुजवा, शाळेचे उडालेले छप्पर बसवा, परिसरात झाडे लावा, असे आदेश सचिव उम्रतकर, मुख्याध्यापक सोयाम यांना राजेश गायनर यांनी दिले. यावेळी कृषी पर्यवेक्षक कल्पेश वाघमारे आदी उपस्थित होते. येवती शाळा व ग्रामपंचायतीच्या कारभारावर त्यांनी नाराजी दर्शविली व कामे सुधारण्याचा इशारा दिला. (तालुका प्रतिनिधी)
धानोरा व येवती येथे कृषी सप्ताह
By admin | Updated: July 7, 2016 02:36 IST