धानोराची घटना : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल उमरखेड : शेतीवरून दोन भावांमध्ये असलेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून यात दोघांच्याही पत्नी जखमी झाल्या. ही घटना तालुक्यातील धानोरा येथे घडली. दोनही गटाच्या सहा जणांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उमरखेड तालुक्यातील धानोरा येथे विठ्ठल काशीराम काळे (५६) आणि उत्तम काशीराम काळे (४५) या दोन भावांमध्ये शेतीवरून वाद सुरू होता. भावकीतील हा वाद विकोपाला जाऊन मंगळवारी रात्री तुफान हाणामारी झाली. यात दोघांच्याही पत्नी जखमी झाल्या. या प्रकरणी विठ्ठल काशीराम काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी उत्तम काशीराम काळे, परिनिता उत्तम काळे आणि सुमित उत्तम काळे या तिघांनी त्यांच्या पत्नी कमल काळे यांना काठीने मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या.या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला तर याच प्रकरणात उत्तम काशीराम काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विठ्ठल काशीराम काळे, कमल विठ्ठल काळे, सुनीता विठ्ठल काळे यांनी उत्तम व त्याची पत्नी परिनिता यांना काठीने बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. यावरून उमरखेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतीचा वाद, भावकीत चालल्या लाठ्याकाठ्या
By admin | Updated: November 18, 2016 02:28 IST