प्रशासनाकडून टोलवाटोलवी : शेत पडिक पडण्याची भीती लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : शेतात जाणारा वहिवाटीचा रस्ता खुला करून मिळावा यासाठी वृद्ध शेतकरी प्रशासनाचे उंबरठे झिजवत असून वर्षभरापासून प्रशासन वृद्धाला टोलवाटोलवी करीत आहे. दुसरीकडे रस्ता नसल्याने शेत पडीक पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पुसद येथील शंकर संभा पिपरवार यांचे महागाव तालुक्यातील शिरपूर शिवारात शेती आहे. या शेतीच्या बाजूला उत्तम सटवा खंदारे यांची वडीलोपार्जीत शेती आहे. परंतु तो गेल्या वर्षभरापासून शंकरराव यांना शेतात जाण्यास मज्जाव करीत आहे. विशेष म्हणजे खंदारे यांनी लघु पाटबंधारेच्या कालव्याची जागा अतिक्रमीत केली. परिणामी शंकरराव यांच्या शेतात जाण्याचा रस्ता बंद पडला. या बाबत रस्ता देण्याची विनंती केली. त्यावेळी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याबाबत त्यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार केली. तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी तळ निरीक्षण केले. तहसीलदारांनी वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्याबाबतचे पत्र १२ मे २०१७ रोजी लघु पाटबंधारे विभागाला दिले. परंतु त्यावरही कारवाई झाली नाही. आता या वृद्ध शेतकऱ्याची शेती पडीक पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही याबाबत लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना पत्र देवून रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्याची हमी दिली. परंतु नेमके पाणी कुठे मुरते हे कळायला मार्ग नाही. परिणामी वृद्ध शेतकरी वहिवाट रस्त्यासाठी पायपीट करताना दिसत आहे.
शेत वहिवाट रस्त्यासाठी वृद्धाची पायपीट
By admin | Updated: June 18, 2017 00:58 IST