नामसाधर्म्याचा गैरफायदा : खऱ्या आदिवासींची राज्यपालांकडे धावपुसद : आदिवासी समाजाच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत अनेक गैरआदिवासी लोक अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. या संदर्भात नुकताच किनवट पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झालेला आहे. त्यामुळे नांदेड, किनवट परिसरात बनावट जात प्रमाणपत्र वाटणारे रॅकेट सक्रिय झाले असून या रॅकेटचा दुष्परिणाम पुसद परिसरातही जाणवत आहे. या गैरप्रकाराला तातडीने आळा घालण्यात यावा, अशी मागणी आदिवासी कर्मचारी संघटनेच्या पुसद शाखेने केली आहे.या संदर्भात संघटनेने पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे मागणीचे निवेदन शनिवारी पाठविले. महादेव व मन्नेरवारलू या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी काही जमातीमधील लोक धडपड करीत असल्याचे दिसून आले. मन्नेरवार या जातीचे लोक ‘लू’ लावून मन्नेरवारलू जमातीचे खोटे प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. १९ जानेवारी रोजी किनवट येथील उपविभागीय अधिकारी यांनी औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या निदर्शनास हा गैरप्रकार आणून दिला आहे. काही बिगर आदिवासी व्यक्तींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिल्याची प्रकरणे यापूर्वीच शासनाच्या निदर्शनास आलेली आहेत. औरंगाबाद विभागीय कार्यालय परिक्षेत्रातील कोळी आणि मन्नेरवार, मुन्नूरकापू, मुन्नूरवार तेलगू, मुन्नूरवाड या जातींनी मोठ्या प्रमाणावर कोळी महादेव व मन्नेरवारलू या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय लाभ घेतल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अलिकडेच उघडकीस आलेल्या किनवटमधील बनावट शासकीय दस्तावेजाने हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला आहे. हा सर्व प्रकार किनवट उपविभागीय अधिकाऱ्यांनी औरंगाबाद कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविला आहे. या संदर्भात किनवट पोलीस खोलात जावून तपासही करीत आहे. आदिवासींचे बोगस जात प्रमाणपत्र काढणारे मोठे रॅकेट नांदेड जिल्ह्यात सक्रिय असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे शासनानेही सखोल चौकशीसाठी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात १० पोलिसांचे विशेष पथक नेमले आहे. संबंधितांनी गुन्हे मागे घेण्यासाठी व तपास पथकावर दबाव आणण्यासाठी उपोषण, मोर्चाचे आयोजन केले आहे. हा प्रकार गुन्हेगारांना मदत करणारा असून उपोषणाची नोटीस देणारे व मोर्चे काढणारे गैरआदिवासी आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यांचे मूळ अभिलेख तपासून गुन्हे नोंदवावे व मूळ आदिवासींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आदिवासी कर्मचारी संघटनेचे गणपतराव गव्हाळे, राजेश ढगे, नारायण कऱ्हाळे, भास्कर मुखाडे, लक्ष्मण नांदे, शिवाजी मारकड, किसन भुरके, पांडुरंग ढाकरे, किसन कुरकुटे, संजय कुरूडे, शंकर इंगळे, फकिरराव साबळे, शंकर अंभोरे, राजाभाऊ वायकुळे, परमेश्वर मोरे, सुखदेव फोपसे, केशव मस्के आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
बनावट जात प्रमाणपत्र वाटणारे रॅकेट सक्रिय
By admin | Updated: February 21, 2016 01:56 IST