आरोग्य केंद्रातील गैरहजेरी भोवली : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या भेटीत आढळले तथ्ययवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी १४ जून रोजी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या होत्या. या भेटीवेळी अनुपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कारवाई केली आहे.फुफाटे यांनी यवतमाळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरी, उपकेंद्र मनपूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा अंतर्गत उपकेंद्र भांब आणि उपकेंद्र किन्ही येथे भेट दिली असता तेथील अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावून खुलासे मागण्यात आले होते. हे खुलासे असमाधानकारक असल्याने कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली.यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर गुजर यांना ताकीद देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया नागभिडकर यांचे एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याबाबतचा प्रस्ताव उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. तसेच ओपीडी एकच वेळा काढल्याने त्यांचे १३ दिवसाचे विनावेतन करण्यात आले आहे. बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन चेर यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. भांब येथील उपकेंद्राच्या महिला आरोग्य सेविका आर. ए. वाकडे या सेवासत्राला गेल्या, परंतु पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याने उपकेंद्र बंद होते. त्यामुळे त्यांना ताकीद देण्यात आली. मनपूर उपकेंद्र आरोग्य सेविका जे. एम. कुनगर यांची वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली आहे. किन्ही उपकेंद्राच्या आरोग्यसेविका एस. के. भगत यांची एक वार्षिक वेतनवाढ स्वरुपात आली आहे. मनपूर उपकेंद्राच्या आरोग्य सेविका शेलारे आणि किन्ही उपकेंद्राच्या कंत्राटी आरोग्य सेविका छाया बरडे यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या कारवाईने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई
By admin | Updated: July 9, 2016 02:42 IST