‘आधार’ ची मदत : नागरिकांनी लिंकिंग करून घेणे आवश्यक यवतमाळ : गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणी मोहीम जिल्हा प्रशासनाकडून वेगाने राबविण्यात आली. याचाच परिणाम म्हणून ९० टक्क्यांहून अधिक आधार नोंदणी जिल्ह्यात झाली आहे. आता आधार कार्ड रेशन कार्डाशी लिंकिंंग करणे सुरू असून यातून मोठ्या प्रमाणात बोगस रेशन कार्ड धारकांवर कारवाई करण्यात येत आहे. आधार कार्ड चा क्रमांक राशन कार्डसोबत लिंकिंग करण्यात येत आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या आधार कार्डची प्रत सबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे देऊन रेशन कार्डसोबत लिंकिंग करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून यापूर्वीच वारंवार करण्यात आले आहे. परंतु अद्यापही बहुतांश नागरिकांनी या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे जे रेशनकार्ड आधार कार्ड क्रमांकाशी जोडलेले नाहीत, असे रेशनकार्ड बोगस ठरविण्यात येऊन ते रद्द करण्यात येत आहेत. यातून जिल्ह्यात हजारो बोगस राशन कार्ड उघडकीस येत आहेत. तर यामध्ये केवळ स्वस्त धान्य दुकानदारांकडून लिकिंग न केल्यामुळे काही प्रामाणिक नागरिकांचेही राशनकार्ड रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी त्वरित आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून आधार लिंकिंग करून आपले राशन कार्ड रद्द होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कुटुुंबातील किमान एका व्यक्तीने जरी आपल्या आधार क्रमांकाची जोडणी रेशन कार्ड सोबत केल्यास असे रेशन कार्ड अधिकृत ठरविण्यात येत आहेत. तर वारंवार सूचना करूनही अद्यापही ज्यांनी रेशन कार्डसोबत आधार लिंकिंग अद्याप केलेले नाही. त्यांचे रेशन कार्ड बोगस ठरविण्यात येऊन ते रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले रेशन कार्ड रद्द होऊ नये, यासाठी आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधून आधार लिंकिंग करून घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
बोगस रेशनकार्डधारकांवर कारवाई
By admin | Updated: July 13, 2016 03:14 IST