दारू विक्रीला विरोध हेच कारण : पोलीस जमादार निलंबित यवतमाळ : तालुक्याच्या यावली (इजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड खूनप्रकरणात दारू विकणारेच नव्हे तर दारू पिणारेही आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस जमादार रवींद्र गिमोणकर यांना निलंबित केले. महादेव टेकाम, दिवाण आत्राम, विलास मोतेकर, नरेश पिंपळकर, कैलास पवार, संजय देवघरे अशी आरोपींची नावे आहे. यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव जंगलचे ठाणेदार गोपाल भारती यांच्या पथकाने या आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली. सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेणारे हे आरोपी पोलिसांच्या ‘प्रसादा’पुढे फुटले. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमच उघड केला. सूत्रानुसार, यावलीतील महिलांचा गावात दारू विक्रीला विरोध होता. या महिलांना पोलीस पाटील राठोड यांचे समर्थन होते. त्यातच तांड्यावर दारू निघत असताना पोडातच बंदी का म्हणून हे दारू विक्रेते चिडले होते. तुम्ही यावलीचे पोलीस पाटील आहात, कोलाम पोडावर हस्तक्षेप करू नका, असे सांगूनही त्यांचा दारू विक्रीला विरोध असल्याने काटा काढला. घटनेच्या रात्री दिवाणने त्यांना काठीने गाडीवरून खाली पाडले व त्यानंतर दगडाने ठेचून खून केला. या खुनाचे प्रात्यक्षिक आरोपींनी दाखविले. त्यांचे रक्ताने माखलेले कपडेही जप्त करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी) आरोपींपैकी केवळ दिवाण कधी-कधी दारू विकत होता. इतर केवळ पिणारे होते. मात्र गावातील बंदीमुळे त्यांना दारू प्यायला वडगावपर्यंत जावे लागत होते. म्हणूनच त्यांचाही दारूबंदीसाठी आग्रह धरणाऱ्या महिलावर रोष होता.
पोलीस पाटलाच्या खुनात दारू पिणारेही आरोपी
By admin | Updated: July 7, 2015 01:54 IST