पोलिसांची दमछाक : आठ तासानंतर लागला छडा, सासऱ्याच्या खुनाचे प्रकरणढाणकी : अंध सासऱ्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणाऱ्या सुनेने मध्यरात्रीच्या सुमारास बिटरगाव पोलीस ठाण्यातून पोबारा केला. या प्रकाराने पोलिसांची पाचावर धारण बसली. रात्रीपासूनच शोध मोहीम सुरू झाली. अखेर भोजनगर येथील नागरिकांच्या मदतीने तिला पकडण्यात यश आले आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. उमरखेड तालुक्यातील नारळी येथील पंचफुला गणेश राठोड या महिलेने सासरा वसराम धनसिंग राठोड यांचा गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून रविवारी रात्री खून केला. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला बांधून ठेवले. पोलिसांनी तिला अटक करून बिटरगाव पोलीस ठाण्यात आणले. सोमवारी न्यायालयापुढे हजर करून तीन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली. ती बिटरगाव पोलिसांच्या कोठडीत असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लघूशंकेचे निमित्त केले. तिच्यावर निगराणी ठेवून असलेल्या एका महिला पोलीसासोबत ती ठाण्याच्या आवारात आली. परंतु काही कळायच्या आत पंचफुलाने महिला पोलिसाला गुंगारा दिला आणि तेथून पळ काढला. हा प्रकार तिने त्वरित ठाणेदार विजय राठोड यांना सांगितला. ठाणेदारांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यासह बिटरगाव परिसर रात्रीतून पिंजून काढला. इकडे पंचफुला भोजनगर तांड्यातील किसन जाधव यांच्या शेतात लपून बसली होती. तिला गजानन राठोड याने पाहिले. एव्हाना परिसरात पंचफुला पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची बातमी पसरली होती. त्यामुळेच गजाननला संशय येताच पंचफुलाला इतर महिलांसोबत निंदनाच्या कामात गुंतविले. तसेच ठाणेदार राठोड यांना पंचफुला भोजनगरमध्ये असल्याची माहिती दिली. राठोड यांनी तातडीने भोजनगर गाठून मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचफुलाला ठाण्यात आणले आणि सुटकेचा नि:श्वास सोडला.(वार्ताहर)ठाणेदाराची कानउघाडणीरात्रभर परिसर पिंजून काढल्यानंतरही आरोपी पंचफुला पोलिसांच्या हाती लागली नाही. या गंभीर घटनेची माहिती ठाणेदार विजय राठोड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दूरध्वनीवरून दिली. या वेळी पोलीस अधीक्षक शर्मा त्यांच्यावर चांगलेच संतापले. एकतर कुठल्याही गंभीर गुन्ह्यातील आरोपी सहसा पोलिसांच्या हाती लागत नाही. नागरिक आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतात. तेव्हा त्यांना सांभाळताही येत नसल्याचे एसपी शर्मा म्हणाले. पंचफुला हाती न लागल्यास आपल्यावर कारवाई होईल, असा सज्जड दमही एसपी शर्मा यांनी ठाणेदार राठोड यांना दिला होता, अशी माहिती पोलिसातून देण्यात आली.
खुनातील आरोपी सून ठाण्यातून पसार
By admin | Updated: July 16, 2014 00:27 IST