बाजारपेठेतील घटना : लुटीचा केला बनाव, घराच्या शौचालयात लपविली रोकड यवतमाळ : स्थानिक सराफा बाजार परिसरातील भाजी मार्केट ते गणपती मंदिर रोडवरील ५० हजारांच्या वाटमारीच्या गुन्ह्यात दुकानाचा नोकरच आरोपी निघाला. त्याने स्वत:च या गुन्ह्याची कबुली दिली असून कथित लुटीतील रोकडही घराच्या शौचालयातून पोलिसांना काढून दिली. दादाराव नागोराव पेंदाम (५५) रा. तलावफैल यवतमाळ असे या आरोपीचे नाव आहे. तो जलालुद्दीन गिलाणी यांच्या के-३००० या दुकानात कार्यरत होता. दादाराववर खासगी सावकाराचे कर्ज होते. या कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होता. अखेर त्यातूनच त्याने ५० हजार ३८० रुपयांच्या रोकड लुटीचा बनाव रचला. ही रक्कम त्याने आपल्या तलावफैलातील घराच्या शौचालयात लपवून ठेवली होती. पोलिसांनी तेथून ती ताब्यात घेतली. दादारावने सोमवारी बाजारपेठेत स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी लुटल्याचा बनाव रचला. परंतु पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. कारण एवढ्या गजबजलेल्या व्यापारपेठेत भरदिवसा अशी लुटीची घटना घडणे शक्य नसल्याचा पोलिसांचा दावा होता. दादारावने सांगितलेल्या सर्व मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कुठेच काही आढळून आले नाही. त्याचे मार्ग, वेळ आणि बयानातही ताळमेळ जुळत नव्हता. अखेर ‘बाजीराव’ काढताच सत्य पुढे आले. नोकर तथा या घटनेतील फिर्यादीच वाटमारीतील आरोपी निघाला. (कार्यालय प्रतिनिधी)
५० हजारांच्या वाटमारीत नोकरच आरोपी
By admin | Updated: October 5, 2016 00:19 IST