यवतमाळ : सफाई कामगारांचे नगरपरिषदेच्या संबंधित विभागाकडून होत असलेले शोषण थांबवावे यासह विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनातून प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. सफाई कामगारांनी केलेल्या कामाचा अहवाल संबंधित वॉर्डाच्या नगरसेवकांकडून घेतला जात आहे. कामगारांची उपस्थिती आणि अनुपस्थिती लावण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहे. या प्रकारात शोषण होत असल्याने हजेरी आणि गैरहजेरी लावण्याचे अधिकार पालिकेने आपल्याकडे ठेवावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना गणवेश, गमबूट, टोपले, पावडे, रेनकोट, गटारं सफाई करणाऱ्यांना गॅसमास्क २००९ पासून देण्यात आलेला नाही, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ड्यूटी घेतानाच या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा दिल्या जात नाही. शैक्षणिक पात्रतेच्या आधारे योग्य ठिकाणी पदोन्नती नाही, सफाई कामगारांसाठी जागा खरेदी करून आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. १९८२-८३ पासून नवीन पदभरती झालेली नाही. यासह इतर बाबी निवेदनात मांडून त्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनिल दसमोगरे, प्रदेश सचिव अशोक ब्राह्मणे, शहर सचिव प्रताप गोंधळे, मेहतर समाज सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बंटी ब्राह्मणे, सचिव संतोष तांबे, नीरज चंदेल, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष लता गोंधळे, पुष्पा ब्राह्मणे, राधा मारवे, माया जगतइटे, रेखाताई सिंघानिया, निलूताई चंदेल, माधुरी व्यास, दुर्गाबाई चंदेल, सुमित्रा मोगरे, लता चव्हाण, रणजिता चंदेल, रत्ना समुद्रे, निर्मला मोगरे, रिना मोगरे, ममता सिंघानिया, अंजू ब्राह्मणे, चंदाताई कोंडावे, रिना व्यास, सुलोचना चंदेल, संगीता मोगरे, किरण कोंडावे, पुष्पा कोंडावे, अनुसया नानहेटकर, कांचन तांबे, रेखा मोगरे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
सफाई कामगारांच्या शोषणाचा आरोप
By admin | Updated: December 9, 2015 02:51 IST