पुसद नगरपरिषद निवडणूक : राजकीय पक्ष अद्यापही उमेदवारांच्या शोधातपुसद : २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या प्रतिष्ठेच्या पुसद नगरपरिषद निवडणुकीत बुधवारी नामांकनाच्या तिसऱ्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराने नामांकन दाखल केले. यंदाच्या निवडणुकीचे खाते उघडले. सध्या सर्वच राजकीय पक्ष अद्यापही उमेदवारांच्या शोधात असून उमेदवारांची निवड करण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षासमोर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे नाव शंकर बोधने आहे. त्यांनी प्रभाग क्र. १३ ब मधून सर्वसाधारण गटातून नामांंकन दाखल केले. पुसद नगरपरिषद निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. यंदा नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे सक्षम व योग्य उमेदवार निवडण्याची मोठी कसरत राजकीय नेत्यांना करावी लागत आहे. तर नगरसेवक पदासाठीही योग्य व पात्र उमेदवार देताना नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे. त्यातच अनेक विद्यमान नगरसेवक तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. उमेदवारांची पळवापळव थांबविणे हेही राजकीय पक्षांसाठी आव्हानच आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत नामांकन दाखल करावयाचे असून यंदा प्रथमच आॅनलाईन नामांकन भरायचे आहे आणि त्याची हार्ड कॉपी एसडीओंकडे द्यावयाची आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांंना या प्रक्रियेला तोंड देणे कठीण जात असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
तिसऱ्या दिवशी उघडले उमेदवारीचे खाते
By admin | Updated: October 27, 2016 01:06 IST