उमरखेड : तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनात दोन तरुणांचा मृत्यू झाला. उमरखेड येथील आयटीआयमध्ये विजेच्या धक्क्याने कामगार तरुणाचा तर दिंडाळा येथील एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. उमरखेड येथील आयटीआय कॉलेजच्या इमारतीवर नेमप्लेटचे काम करताना विजेचा धक्का लागून दिवाराम इराजी देवासी (२४) रा. डोंगरगाव, ता. बागोडा जि. जालोर (राजस्थान) जागीच ठार झाला. येथील बाळदी रोडवरील शासकीय औद्योगिक महाविद्यालयात तो नेमप्लेट बसविण्याचे काम शुक्रवारी करीत होता. त्याला विजेचा जबर धक्का लागल्याने तो ३० फूट उंच इमारतीवरुन खाली कोसळला आणि जागीच ठार झाला. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील दिंडाळा येथे घडली. गावानजीकच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेलेल्या विशाल शरद जाधव (१५) याचा बुडून मृत्यू झाला. तो गुरूवारी दुपारी ११ वाजता गावानजीकच्या शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. तो घरी परत आला नाही. म्हणून त्याचा शोध घेतला परंतु थांगपत्ता लागला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गावकऱ्यांनीही त्याचा विहिरीत शोध घेणे सुरू केले तेव्हा रात्री १० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
उमरखेड तालुक्यात दोन तरुणांचा अपघाती मृत्यू
By admin | Updated: July 16, 2016 02:36 IST