यवतमाळ : बुलडाणा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या वीज उपकार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांच्या येथील घराला मंगळवारी सायंकाळी यवतमाळ ‘एसीबी’ने सील लावले. नवीन वीज मीटर देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांना बुलडाणा येथे तेथील ‘एसीबी’ने रंगेहात अटक केली. अंबाडकरविरुद्ध बुलडाणा ‘एसीबी’ने गुन्हाही नोंदविला. अंबाडकर यांचे घर वाघापूर परिसरातील राधाकृष्णनगरीत आहे. बुलडाणा ‘एसीबी’च्या सूचनेवरून यवतमाळ ‘एसीबी’चे उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनातील पथकाने अंबाडकर यांच्या येथील घरी धडक दिली. त्यावेळी घराला कुलूप आढळले. म्हणून ‘एसीबी’ने या घराला सील लावले. अंबाडकर यांची बुलडाण्याला पदोन्नतीवर बदली झाली असली तरी त्यांचे कुटुंबीय अद्याप यवतमाळातच राहते. मात्र सध्या ते बाहेरगावी असल्याने घराला कुलूप होते. आता अंबाडकर यांच्या उपस्थितीत या घराचे सील उघडून सर्च घेतला जाणार असल्याची माहिती ‘एसीबी’च्या सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. अंबाडकर यापूर्वी घाटंजी तालुक्यात कार्यरत होते. तेथेही त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. अंबाडकर यांची कार्यपद्धती नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. ट्रॅपनंतरच्या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रशांत अंबाडकर यांच्या यवतमाळातील घराची झडती घेतली जाणार असल्याचे ‘एसीबी’ने स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)
वीज अभियंत्याच्या घराला ‘एसीबी’ने सील ठोकले
By admin | Updated: October 8, 2015 02:06 IST