जिवीतहानी टळली : वणी-वरोरा मार्गावरील घटना, प्रसंगावधानामुळे आगीवर नियंत्रण वणी : रूग्णांना जीवनदान देणाऱ्या एका १०८ रूग्णवाहिकेने गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वणी-वरोरा मार्गावर अचानक पेट घेतला. या आगीवर अग्नीशमन दलाने नियंत्रण मिळविल्यामुळे जिवीतहानी टळली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमाने राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवा संपूर्ण तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून सेवा देत आहे. गुरूवारी दुपारी मंदर शिवारात एक अपघात झाल्याची माहिती वणी पोलीस ठाण्यातून मिळताच ही रूग्णवाहिका वेगाने घटनास्थळी पोहोचली. मात्र तोपर्यंत रूग्णाला दुसऱ्या रूग्णवाहिकेत नेण्यात आले होते. त्यामुळे ही रूग्णवाहिका पुन्हा वणीकडे परत निघाली. दरम्यान वरोरा नाक्याजवळ रूग्णवाहिका पोहोचताच अचानक तिने पेट घेतला. यावेळी चालक लक्ष्मण देहारे यांनी रूग्णाहिकेमध्ये असलेल्या अग्नीशमन यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून काही नागरिकांनी लगेच येथील नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेच वाहन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे जिवीतहानी टळली. या आगीत रूग्णवाहिकेमध्ये असलेले आॅल्टनेटर, बॅटरी, रेडीएटर, कॅबीन, वायरींग संपूर्ण जळून खाक झाली. यात जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले. रूग्णवाहिकेचे चालक लक्ष्मण देहारे, देवी जाधव, श्याम तांबे, नरेंद्र बीर यांच्या प्रयत्नाने मोठी हानी टळली. (प्रतिनिधी)
धावत्या रूग्णवाहिकेने घेतला पेट
By admin | Updated: November 4, 2016 02:06 IST