कुशलचे ३४ लाख रखडले : ७० लाख रोपनिर्मितीचा प्रश्न यवतमाळ : जिल्ह्यात वनविभागाकडून रोजगार हमी योजनेंतर्गत ८४ रोपवाटिका चालविण्यात येतात. यातून ६९ लाख ५ पाच हजार ८४५ रोपांची निर्मिती अपेक्षित आहे. मात्र कुशल कामाचे अनुदान रखडल्याने या रोपवाटिका धोक्यात आल्या आहेत. ३४ लाख रुपये मिळविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. वेळेत अनुदान न मिळाल्यास रोपांची निर्मिती करणे शक्य होणार नाही. वनविभागाकडून ८४ रोपवाटिकेचे प्रस्ताव रोहयो विभागाला पाठविण्यात आले. याला मंजुरीसुद्धा मिळाली. मात्र अजूनपर्यंत अनुदानच न आल्यामुळे रोपवाटिकेत बियांच्या लागवडीचे काम रखडले आहे. एकीकडे शासन दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून आहे. मात्र त्या दृष्टिकोनातून कोणतीच तयारी होताना दिसत नाही. वनविभाग रोजगार हमी योजनेच्या अनुदानातूनच रोपवाटिकेची कामे करतात. अकुशल कामाचे अनुदान भरपूर असले तरी ५० टक्के कामे ही कुशलमध्ये मोडतात. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांना ३४ लाख रूपयांची आवश्यकता आहे. हा निधी वेळेत न मिळाल्यास रोपवाटिकांचा फज्जा उडणार आहे. या रोपवाटिकांसाठी रोहयोतून अकुशल कामांसाठी सात कोटी २३ लाख १८ हजार रूपये मंजूर झाले. तर कुशल कामासाठी ३ कोटी ९ लाख २५ हजार तरतूद आहे. अशी एकूण १० कोटी ३२ लाख ४३ हजार रूपयांची तरतूद केली आहे. यापैकी केवळ एक कोटी एक लाख चार हजार रूपये अग्रीम प्राप्त झाला आहे. यातून रोपवाटिकेचे काम करणे शक्य नाही. रोपवाटिकेत खते, बिया व प्लास्टिक पिशव्या खरेदी कराव्या लागतात. यासह अनेक कुशल घटकांत मोडणाऱ्या कामांसाठी पैसाच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
वनविभागाच्या ८४ रोपवाटिका धोक्यात
By admin | Updated: March 7, 2017 01:24 IST