अविनाश खंदारे उमरखेडशेतशिवारांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यावरून दळणवळण सुलभ व्हावे यासाठी उमरखेड तालुक्यात ८० पांदण रस्त्यांसाठी १८ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. परंतु महसूल आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणाने पांदण रस्त्याचे काम लालफितीत अडकले आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या या कामांमुळे शेकडो मजुरांना कामही मिळाले असते. मात्र मजुरांचे हातही रितेच आहे.शासनाने सतत निर्माण होत असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पीक घरापर्यंत नेण्यासाठी दळणवळण चांगले व्हावे म्हणून पांदण रस्त्याची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. या पांदण रस्त्यांचे काम रोजगार हमी योजनेतून केल्यास रस्तेही तयार होती आणि मजुरांच्या हातालाही काम मिळेल. या दुहेरी उद्देशाने मंजुरी देण्यात आली आहे. महत्वाकांक्षी या योजनेला महसूल प्रशासन आणि जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग सुरुंग लावत आहे. १८ कोटी ६० लाख ६० हजार रुपयांचे पांदण रस्ते रखडले आहे. काहींच्या कामांना सुरुवात झाली नाही तर काही कामे अर्धवट आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सदर कामे रखडलेली आहे. तालुक्यातील टाळकी ते राहूर पांदण रस्ता २१ लाख २१ हजार, टाकळी इजारा भाग २ ते अमडापूर २१ लाख ४२ हजार, टाकळी इजारा भाग ३ ते रामूनाईक तांडा २१ लाख ३२ हजार, आरोग्य केंद्रापासून किनवट रोडपर्यंत अमडापूर रस्ता २१ लाख ३२ हजार, अमडापूर ते भवानी २१ लाख ३२ हजार, तिवरंग ते मुळावा २४ लाख ६० हजार, धनज अंतर्गत खडीकरण १२ लाख १२ हजार, चुरमुरा ते दिंडाळा २४ लाख ६६ हजार, उमरखेड ते चुरमुरा २४ लाख ९४ हजार, तिवरंग नांदला पांदण रस्ता १६ लाख ३३ हजार, ब्राम्हणगाव ते बालाजी मंदिर भाग १ - २२ लाख ८ हजार, ब्राम्हणगाव ते बालाजी मंदिर भाग २ - २२ लाख १२ हजार, ब्राम्हणगाव ते बालाजी मंदिर भाग ३ - २२ लाख १२ हजार, ब्राम्हणगाव ते बालाजी मंदिर भाग ४ - १२ लाख ८२ हजार, पोफाळी ते कुपटी १८ लाख ७४ हजार या सोबतच मुरली, मोरचंडी, मानकेश्वर, पार्डी, टाकळी, झाडगाव, नारळी, तरोडा, वरंदळी, बिटरगाव बु., पेंदा, जनुना, निंगनूर, अंबाळी, निंगनूर, कृष्णापूर, बेलखेड, परजना, लोहारा, चातारी, साखरा आदी८० गावांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून परस्पर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विकास कामांना खीळ बसली असल्याचे तालुक्यात दिसत आहे.
८० पांदण रस्ते अडकले लालफितीत
By admin | Updated: May 13, 2015 02:17 IST