पुसद : शांततेतून समृद्धीकडे हे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी गंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१३-१४ या वर्षातील तंटामुक्त गावांची शासनाने नुकतीच घोषणा केली असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १२०९ गावांपैकी ५८ ग्रामपंचायती पूर्णपणे तंटामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तंटामुक्त गावांमध्ये शांतता नांदण्याची चिन्हे असून त्यांचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. राज्य शासनाने गावात तंटे निर्माण होवू नये तसेच सुरू असलेले तंटे गावातच लोकांच्या सामंजस्यातून मिटविण्यासाठी सन २००७ मध्ये तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आला असून यावर्षी जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींनी तंटामुक्त होत एक कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोख बक्षिसे पटकाविली आहेत. यामध्ये राळेगाव तालुक्यातील सर्वाधिक ११ गावे तंटामुक्त होवून हा तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. आठ गावे तंटामुक्त झालेला मारेगाव तालुका द्वितीय, तर सात गावे तंटामुक्त झालेला यवतमाळ तालुक्याने तृतीय क्रमांक पटकाविला. महागाव आणि आर्णी तालुक्यातील प्रत्येकी एक गाव तंटामुक्त झाले आहे. राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस ठाण्यांतर्गत बोरी इजारा, एकुर्ली व खैरगाव, राळेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कजरी, चिखली, पिंपळखुटी, सानुर्ली, मेघापूर, वरूड, वाटखेड, वालधूर आदी गावे तंटामुक्त घोषित करण्यात आली आहे. मारेगाव पोलीस ठाण्यांतर्गत शिवनाळा, गौराळा, मांगरूळ, शिदी(महागाव), मच्छिंद्रा, दांडगाव, हिवरी व मजरा अशी आठ गावे, तर यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरझडी(चिंच), चांदापूर, कार्ली, येरड, वाई(रुई) आणि वडगाव पोलीस ठाण्यांतर्गत बारा व पिंपरी(बुटी) ही गावे तंटामुक्त झाली आहेत. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत धानोरा(इजारा) व जनुना, उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस ठाण्यांतर्गत तरोडा व बिबी, उमरखेड पोलीस ठाण्यांतर्गत नागेशवाडी व वाळदी अशी एकूण चार गावे तर महागाव पोलीस ठाण्यांतर्गत दहीवड(खु) हे एकमेव गाव तंटामुक्त झाले आहे. बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा, वाटखेड(खु) व वीरखेड ही तीन गावे, झरी तालुक्यातील पाटण पोलीस ठाण्यांतर्गत येणारे चिखलडोह व पाटण ही दोन गावे तर मुकुटबन पोलीस ठाण्यांतर्गत एकमेव बोपापूर हे गाव तंटामुक्त झाले आहे. वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत शेलु(बु), शिरपूर व कोलगाव ही तीन गावे, केळापूर तालुक्यातील कोठोडा, मोहदा, रुंझा, साखरा ही चार गावे, घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्यांतर्गत कोपरी(कापसी), कवठा(खु) ही दोन गावे, नेर तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्यांतर्गत एकमेव सोनवाढोणा आणि नेर पोलीस ठाण्यांतर्गत खोलापुरी, वाळकी ही दोन गावे, दारव्हा तालुक्यातील हातोला, कोहळा, बोदेगाव, साजेगाव, तरनोळी, खोपडी ही सहा गावे, तर आर्णी तालुक्यातील एकमेव देऊरवाडी(बु) हे गाव तंटामुक्त झाले आहे. पांढरकवडा व दिग्रस तालुक्यातील एकही गाव तंटामुक्त झालेले नाही, हे विशेष. राज्य शासनाने तंटामुक्त गावांसाठी घोषित केलेला पुरस्कार व रक्कम तंटामुक्ती झालेल्या गावांना देण्यात आला आहे. या सर्व गावांचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, एएसपी जानकीराम डाखोरे आदींनी कौतुक केले आहे. या तंटामुक्त ग्रामपंचायतींचा आदर्श घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायती तंटामुक्त
By admin | Updated: April 10, 2015 00:14 IST