मंजुरी : दीडशे अतिरिक्त वर्गखोल्या यवतमाळ : प्राथमिक शिक्षणासाठी ५६ कोटींच्या अर्थसंकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागापुढील आर्थिक पेच संपुष्टात येणार आहे. यासोबतच जिल्ह्याला १५० अतिरिक्त वर्गखोल्या मिळणार आहे.दरवर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत अर्थसंकल्प सादर केला जातो. याला मंजुरीनंतर पुढील उपाययोजनांना प्रारंभ होतो. जिल्ह्याच्या ला ५६ कोटी ५१ लाख १६ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. जिल्ह्यात बांधकामासाठी सर्वाधिक आठ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यातून आवश्यकता असणाऱ्या १५० शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या बांधण्यात येणार आहे. यासोबतच अपंगांसाठी ७१ शाळांमध्ये रॅम्प बांधण्यात येईल. विशेष प्रशिक्षणासाठी २५ लाख रुपयांची तर हंगामी वसतिगृह चालविण्यासाठी ७७ लाख रुपये दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पाच कोटी ८३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील मुलांना गणवेश वितरित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी ५१ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विविध संशोधनासह मूल्यमापनासाठी एक लाख ७१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध कामांसाठी शाळांना दोन कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी आणि रंगरंगोटीसाठी दोन कोटी ६८ लाख रुपये मिळणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षणासाठी ९३ लाख रुपये दिले जाणार आहे. लोकजनजागृतीसाठी २३ लाख रुपयांची तरतूद आहे. (शहर वार्ताहर)
प्राथमिक शिक्षणचे बजेट ५६ कोटींचे
By admin | Updated: August 16, 2014 23:42 IST