यवतमाळ : उसनवार घेतलेले ५० रुपये परत मागितल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या लहान भावाने मोठ्या भावाचा शेल्याने गळा आवळून खून केला. ही खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील पहूर इजारा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दुलसिंग पंडित राठोड (६०) रा. पहूर इजारा असे मृताचे नाव आहे. तर रामलाल पंडित राठोड (५०) रा. पहूर इजारा असे मारेकरी भावाचे नाव आहे. दुलसिंगने काही दिवसांपूर्वी रामलाल याला ५० रुपये उसनवार दिले होते. मात्र रामलालने सांगितल्या प्रमाणे ते परत केले नाही. तेव्हा दुलसिंगने त्याला ५० रुपये परत मागितले. त्यावरून रामलालने त्याच्याशी वाद घातला. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शेल्याने गळा आवळला. त्यामध्ये श्वास थांबून दुलसिंग ठार झाला. त्यानंतर मारेकरी रामलाल हा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून पसार झाला. ही बाब काही वेळाने स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वडगाव (जंगल) पोलिसांना दिली. त्यावरून पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रामलालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून मारेकरी रामलाल राठोड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. तसेच त्याला अटकही केली. (स्थानिक प्रतिनिधी)
५० रुपयांसाठी भावानेच केला खून
By admin | Updated: October 11, 2014 23:13 IST