वीज जोडणी कापली : महावितरणची ग्रामपंचायतींकडे सात कोटींची देयके थकीत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भर उन्हाळ्यात आणि पाणी टंचाईच्या काळात महावितरणने जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेची वीज कापली. सात कोटींच्या थकबाकीसाठी वीज वितरणने हे पाऊल उचलल्याने या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा योजनेचे तब्बल १६ कोटी ७० लाखांचे वीज बिल थकले होते. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतींनी देयकाचा बरणा केलाच नाही. चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीतून ही थकबाकी भरणे अपेक्षित होते. चौदाव्या वित्त आयोगातून प्राधान्याने पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याचे शासन आदेशही होते. मात्र ग्रामपंचायतींनी हा निधी दुसऱ्याच ‘अर्थपूर्ण’ योजनांवर खर्च केला. परिणामी वीज बिलाची थकबाकी कायम राहिली. ही थकबाकी सतत वाढतच आहे. थकित देयकांसाठी वीज वितरणने आधी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला होता. मात्र प्रशासनाने चक्क हात वर केले. सर्वच गटविकास अधिकाऱ्यांनीही थकित देयक भरण्यास असमर्थता दर्शविली. ग्रामपंचायती तर आधीच देयक भरण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे अखेर वीज वितरण कंपनीने टोकाचा निर्णय घेऊन थकबाकीदार पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा कापण्यास सुरूवात केली. यात जिल्ह्यातील ७०८ पाणी पुरवठा योजनांचे वीज जोडणी कापण्यात आली. या कारवाईचा धसका घेऊन काही ग्रामपंचायतींनी नंतर थकीत देयक अदा केले. त्यांची वीज जोडणी पूर्ववत करून देण्यात आली. यानतंरही अद्याप ४७४ ग्रामपंचायतींनी देयकाचा भरणाच केला नाही. परिणामी या गावांतील वीज पुरवठा बंद असल्याने पाणी पुरवठा योजनाही ठप्प पडल्या आहे. अशा ग्रामपंचायतींकडे अद्याप सात कोटी ५५ लाख रूपयांची थकबाकी कायमच आहे. तेथील नागरिक पाण्यासाठी आटापिटा करीत आहे. मात्र उन्हाळ्यात त्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. १२४ योजना कायम बंद जिल्ह्यातील तब्बल १२४ ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा योजनेच्या देयकापोटी अद्याप एक खडकूही महावितरणकडे जमा केला नाही. त्यांना वारंवार सूचना देऊनही अप्योग झाला नाही. अखेर वीज वितरणने या १२४ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केला आहे. त्यामुळे या १२४ गावांतील ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तेथील सरपंच, सदस्य व सचिवांविरूद्ध गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. वीज वितरणने थकबाकीदार ग्रामपंचायतींना पाच टप्प्यात मुद्दल भरण्याची मुभा दिली. त्यानंतरही वीज देयक न भरल्यास वीज जोडणी कापण्याचे आदेश आहे. त्यानुसार कंपनीने कारवाई केली आहे. - विजय भटकर, अधीक्षक अभियंता, वीज कंपनी.
४७४ गावांचा पाणीपुरवठा ठप्प
By admin | Updated: May 11, 2017 00:59 IST