डिजिटल अभिलेखे : ५४ तलाठी अद्यापही परंपरागत यवतमाळ : राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण आणि अभिलेखे डिजिटलायझेशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील तब्बल ४७४ तलाठ्यांनी आॅनलाईन कामकाज सुरू केले आहेत. तर ५४ तलाठ्याकडेच लॅपटॉप नसल्याने ते परंपरागत पध्दतीचाच वापर करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या अहवालात ही बाब पुढे आली आहे. महसूल विभागाचे संपूर्ण कामकाजच आॅनलाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याची सुरूवात तलाठी साजापासून करण्यात आली आहे. तलाठ्याचे दफ्तर आॅनलाईन करण्यात येत आहे. यासाठी कार्यरत असलेल्या ५२८ तलाठ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय त्यांना लॅपटॉप घेण्याची सूचना दिली होती. त्यानुसार ४७४ तलाठ्यांनी लॅपटॉप घेतले आहे. त्याचा वापर केला जात आहे. जिल्ह्यात २ हजार ३२ गावे असून ६२८ साजा आहेत. त्यासाठी ६४९ तलाठ्यांचे पद निर्माण केले आहे. प्रत्यक्षात मात्र ५२८ कार्यरत आहेत. यातील दोन तलाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. ज्या तलाठ्यांनी लॅपटॉप बाळगणे सुरू केले आहेत त्यापैकी २२७ जणांकडे प्रिंटर आणि ४४० जणांकडे डाटा कार्ड आहेत. यामाध्यमातून ते तहसील कार्यालयासोबत आॅनलाईन जोडले गेले आहेत. याशिवाय प्रत्येक तलाठ्याला डिजीटल सिग्नेचरही देण्यात आली आहे. ३६८ तलाठी याचा वापर करत आहेत. आणखी २०३ तलाठ्यांची डिजीटल स्वाक्षरी प्रलंबित आहे. आतापर्यंत ५१० तलाठ्यांनी ई-चावडी करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. लवकरच याची प्रक्रिया पुर्ण करून रखडलेल्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यात येणार आहे. आॅनलाईनच्या माध्यमातून ई- फेरफार, ई-सातबारा, पेरेपत्रक आणि तत्सम प्रमाण पत्र पुरविण्याची सुविधाही दिली जाणार आहे. त्यासाठी सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचे डीएससी (डिजीटल स्वाक्षरी) प्राप्त करून देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. संपूर्ण कार्यक्रम एनआयएसकडून राबविला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ४७४ तलाठी झाले आॅनलाईन
By admin | Updated: November 19, 2014 22:47 IST