जनजीवन प्रभावित : पाच वर्षातील सर्वात मोठी झड, मांगलादेवी येथे भिंत कोसळली नेर : मागील पाच दिवसांपासूनच्या पावसाची तालुक्यात ४३२ मिमी एवढी नोंद करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झाले होते. पाच वर्षातील सर्वात मोठी झड असल्याचे सांगितले जाते. पावसाळ््यातील सुरूवातीचे नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा चिंताग्रस्त होता. पेरणीचा कालावधी संपत असतानाही पावसाला सुरूवात झाली नव्हती. दरम्यान काही भागात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. पुढे १० ते १५ दिवस पाऊस नसल्याने काही लोकांची पेरणी उलटली. उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मात्र पेरण्या साधल्या गेल्या. मागील पाच दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकं बहरली आहे. काही शेतांमध्ये तण वाढले असले तरी काढणीसाठी उपाययोजना केल्या जात आहे. तीन दिवस शेतात कुठलीही कामे झाली नसल्याने मजूर मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पावसामुळे तालुक्यातील मांगलादेवी येथे भिंत कोसळून एक वृद्धा दगावली. काही शेतांमध्ये पाणी शिरल्याने थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले. उमर्ठा येथे पूल वाहून गेला. अनेक रस्त्याच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले. सततच्या पावसामुळे संपूर्ण बाजारपेठ थंडावली होती. रेलचेल थांबली होती. मंगळवारी पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन सुरळीत झाले. सन २०१३ नंतर पावसाची ही सर्वात मोठी झड असल्याचे सांगितले जाते. तालुक्यात २०१२ मध्ये १४४ मिमी, २०१३ मध्ये २९८ मध्ये मिमी, २०१४ मध्ये १०६ मिमी तर २०१५ मध्ये १८० मिमी पावसाची नोंद जून महिन्यात झाली होती. यावर्षी जुलैच्या सुरूवातील एकूण ४३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने पाणी समस्या सुटली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नेर तालुक्यात ४३२ मिमी पाऊस
By admin | Updated: July 14, 2016 02:32 IST