वीज पुरवठा खंडित : मालमत्तेचे लाखोचे नुकसान यवतमाळ : सलग पाच दिवस कोसळलेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील ४३ गावांना बसला. घराच्या पडझडी सोबत शेतातील पीक खरडून गेले. रस्ता, वीज आणि पुल या सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. याचा प्राथमिक अहवल जिल्हा प्रशासनाने आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे. पुसद तालुक्यातील गौळ खुर्द, कोंडाई, ब्राम्हणगाव, धानोरा ईजारा, हिवळणी तलाव, जांबनाईक येथे १५ घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. उमरखेड तालुक्यातील पळशीमध्ये आलेल्या पुरात आठ शेळया वाहून गेल्या. दिग्रस तालुक्यातील ३० गावांना पावसाचा फटका बसला. या ठिकाणी ५० घरांची पडझड झाल्याचा अहवाल नैसर्गिक आपत्ती विभागाकडे आला आहे. आर्णी तालुक्यातील सहा गावांना पुराचा फटका बसला. मसोला, वरूड, केळझर, नाईकनगर, कवठा बु, खडका गावाचा यामध्ये समावेश आहे. या ठिकाणी ९ घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. झरी तालुक्यातील कथली बोरगाव गावात पाणी शिरले याठिकाणी मोठे नुकसान झाले. काशीनाथ धोबाडे यांचा बैल पाचपोर प्रकल्पात वाहून गेला. या तालुक्यातील नदी काठच्या शेत शिवारात मोठया प्रमाणात पाणी शिरले. पुराने जमीन खरडून गेली आहे. शेतीच्या नुकसानीचा आकडा अद्याप पुढे आला नाही. यासोबतच वीज खांब आडवे पडून विजेच्या तारा तुटणे, रस्ता उखडणे, पुलाला काही ठिकाणी तडे गेल्याने लाखोचे नुकसान झाले. (शहर वार्ताहर)
४३ गावांतील घरांची पडझड, पिके खरडली
By admin | Updated: July 14, 2016 02:22 IST