अखेर एकमत : नगरपरिषदेची सभा आर्णी : विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या येथील ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवर अखेर सोमवारी एकमत झाले. योजनेचे काम सुरू व्हावे यासाठीचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. आता या योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. गेली दोन वर्षांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने या योजनेच्या कामामध्ये अडथळा येत होता. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता पालिकेतील पदाधिकारी आणि सदस्यांनी या योजनेसाठी हो भरला. नगरसेवक अनिल आडे, छोटू देशमुख, प्रवीण मुनगीनवार, नारायण चलपेलवार, रेखा ढाले आदींनी सदर योजना त्वरित सुरू व्हावी यासाठीचा ठराव घ्यायला लावला. नगराध्यक्ष आरीज बेग यांच्यासह उपस्थित सर्व नगरसेवकांनी या ठरावाला संमती दर्शविली. यानंतर मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी रितसर निविदा प्रक्रिया पार पाडली. याशिवाय सभेमध्ये विविध विषय चर्चिले गेले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ३० लाख ८१ रुपये प्राप्त झाले आहे. ५८४ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रति शौचालय १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कृषी विभागामार्फत शेतकरी हिताच्या योजना राबविल्या जाव्या, अशी मागणी प्रवीण मुनगीनवार यांनी केली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा असे नारायण चलपेलवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रावण मडावी, शाहीन पठाण, गणेश हिरोळे, अनिताताई भगत, ज्योतीताई थोरकर, मंगला ठाकरे, अंजली खंदार, कौशल्याबाई इंगळे, रेखा ढाले, जावेद सोलंकी, शेखर लोळगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, नगराध्यक्ष आरीज बेग यांनी या पाणी पुरवठा योजनेला गती देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)
आर्णीतील ४२ कोटींच्या नळ योजनेचा मार्ग मोकळा
By admin | Updated: December 3, 2015 02:43 IST