लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत दीड महिन्यापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. हा संप अजूनही मिटण्याचे नाव घेत नाही. एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३५३ कर्मचारी नोकरीवर हजर झाले आहे. या कर्मचाऱ्यांना परत येण्यासाठी पहिले अल्टिमेटम सोमवारपर्यंतचे होते. सोमवारपर्यंत सात कर्मचारी आले. आता आणखी तीन दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता कर्मचारी प्रत्यक्षात काय निर्णय घेतात त्यावरच एसटीच्या कामाची गती निर्धारित असणार आहे. परिवहन महामंडळाच्या ९० टक्के बसेस आगारातच आहे. केवळ २२ बसेसवर वाहतूक सुरू आहे. जे कर्मचारी कामावर हजर झाले त्यामध्ये कार्यालयीन कामकाज करणारेच कर्मचारी आहे. चालक, वाहक यांची संख्या बोटावर मोजण्यासारखी आहे. उत्पन्नाचा स्त्रोत असलेले चालक, वाहक हे कर्मचारी कामावर यावे, अशी अपेक्षा आहे.
अखेरच्या दिवशी सात जण हजर- परिवहन महामंडळाने सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास निलंबन मागे घेण्यात येईल, असा शब्द दिला. यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी येतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सात कर्मचारीच अखेरच्या दिवशी आले.
कर्मचाऱ्यांना अल्टीमेटमवर अल्टीमेटम
- परिवहन महामंडळाचा संप सुटता सुटेना असा झाला आहे. या कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत परत येण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला होता. - केवळ सात कर्मचारी सोमवारी परतले. अजूनही फार मोठी संख्या आंदोलनात सहभागी आहे. आता महामंडळाने आणखी तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला.
बसेस धावू लागल्या रस्त्यावर
- आतापर्यंत यवतमाळ, पांढरकवडा, वणी आणि राळेगाव या तालुक्यातील २२ एसटी बसेस सुरू झाल्या आहे. ४२९ बसेसपैकी केवळ २२ एसटी बसेस सुरू करण्यात परिवहन महामंडळाला यश प्राप्त झाले.
कार्यालयीन कर्मचारी वाढलेएसटीला उत्पादन मिळवून देणारे चालक, वाहक यांची उपस्थिती नगन्य आहे. केवळ कार्यालयीन कर्मचारीच वाढले आहे. - श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक