दिग्रस : नागपूर, वाशिमची वाहने दिग्रस : दिग्रस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गुरुवारी दुपारी अचानक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली. या तपासणीत ३१ लाख ६८ हजारांची रोकड आढळून आली. या रकमेचा स्त्रोत शोधण्याचे काम पोलीस व प्रशासनाकडून सुरू आहे.२७ नोव्हेंबरला दिग्रस नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने पोलीस व महसूल प्रशासन तयारीला लागले आहे. गुरुवारी १० नोव्हेंबरला उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या नेतृत्वातील पथकाने अचानक दुपारी १२ ते २ या काळात दिग्रसमध्ये नाक्यावर वाहनांची तपासणी केली. त्यात एम.एच-३७-डी-९९९ या वाहनात २४ लाख रुपये आढळून आले. मो.साहील जाकीर लंघा रा. मानोरा जि. वाशिम असे या वाहन चालकाचे नाव आहे. आर्णी तपासणी नाक्यावर एम.एच.३१-सीएस-२३११ या वाहनाची तपासणी केली असता त्यात तीन लाख ६८ हजार रुपये आढळून आले. नागपूरच्या जरीपटका येथील नितीन टेकनदास अडवाणी यांच्या मालकीचे हे वाहन आहे. याशिवाय एम.एच-२६-एके-५५७३ या वाहनातून तीन लाख रुपये जप्त करण्यात आले. सय्यद अबरार हुसेन रा. दिग्रस हा या वाहनाचा चालक आहे. दिग्रसच्या वसंतनगरातील शाम रामसिंग पवार यांच्या एम.एच-२९-जी-७३९ या वाहनाची तपासणी केली गेली. मारूती-८०० या वाहनातून दीड लाख रुपये जप्त करण्यात आले. एकूण ३१ लाख ६८ हजार रुपये जप्त करण्यात आले. या रकमेचा नगरपरिषद निवडणुकीसाठी तर वापर केला जात नाही ना या दृष्टीने तपास केला जात आहे. या पथकामध्ये सहायक निवडणूक अधिकारी किशोर बागडे, शेषराव टाले, सहायक पोलीस निरीक्षक गजानन खारडे, ए.व्ही. राठोड, नायब तहसीलदार दळवी, व्ही.जी. इंगोले, विठ्ठल कुमरे, एस.के. पांडे, संजय राठोड, दयाराम पवार, नुरुल्ला खान, देविदास जाधव, सुनील पवार, विवेक पारटकर यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
वाहनांच्या तपासणीत ३४ लाख रोकड जप्त
By admin | Updated: November 11, 2016 01:59 IST