ट्रॅपमध्ये सर्वाधिक पोलीसच : उपवनसंरक्षक, तालुका अधिकाऱ्यासह तीन सरपंचांवरही केली कारवाई यवतमाळ : २०१६ या वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात २८ लाचखोर अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींच्या मुसक्या आवळण्यात ‘एसीबी’ला (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यश मिळाले. यात सर्वाधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी आहे. त्या खोलाखाल ग्रामविकास विभागाचा क्रमांकअसून नंतर महसुलातील लाचखोरीचा क्रमांक लागतो. वर्षाच्या सुरुवातीलाच लोहारा पोलीस ठाण्यातील शिपायासह खासगी इसमाला लाच घेताना पकडण्यात आले. जानेवारी महिन्यात तीन ट्रॅप झाले. त्यात सरपंचासह एका इसमाचा समावेश आहे. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, आॅक्टोबर या तीन महिन्यामध्ये प्रत्येकी तीन ट्रॅप यशस्वी झाले. यात वन विभागातील उपवनसंरक्षक अविनाश घनमोडे हा बडा मासा हाती लागला. मात्र त्यातही पोलीस हवालदार व शिपाई यांचीच संख्या अधिक आहे. वडकीचे सरपंच, विक्रीकर निरीक्षकही लाच घेताना सापडले. एप्रिलमध्ये आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह एका व्यक्तीला अटक झाली. मे महिन्यात कृषी विभागातील लेखाधिकारी आणि आरोग्य विभागातील आरोग्य सहायक अडकले. सर्वाधिक ट्रॅप जून महिन्यात यशस्वी झाले. त्यात दोन ग्रामसेवकांसह एक सरपंच, सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक व पोलीस हवालदार हाती लागला. आॅगस्टमध्ये केवळ एकच ट्रॅप झाला. त्यातही पोलीस शिपाई अडकला. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पंचायत समितीतील महिला कृषी अधिकारी लाच घेताना सापडल्या. डिसेंबरमध्ये २६ तारखेला उमरखेड येथे दोन पोलीस शिपाई पुन्हा एसीबीच्या जाळ्यात अडकले. आता वर्ष संपायला चार दिवसांचा अवधी असला, तरी यात किती लाचखोरांची भर पडते, हे महत्वाचे ठरणार आहे. नोटाबंदी निर्णयानंतरही दोन ट्रॅप यशस्वी होऊन त्यात तीन आरोपी हाती लागले. (कार्यालय प्रतिनिधी)
वर्षभरात २८ लाचखोर ‘एसीबी’च्या जाळ्यात
By admin | Updated: December 28, 2016 00:16 IST