उमरखेड नगरपरिषद : ४८ मतदान केंद्र, आजपासून नामांकन उमरखेड : नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कर्मचारीवर्ग कामाला लागला आहे. एकंदर १२ प्रभागातून २४ उमेदवार निवडून द्यावयाचे असून २४ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार आहे. २७ नोव्हेंबरला मतदान व्हायचे आहे.उमरखेड नगरपरिषदेसाठी वाढीव आकड्यांसह एकूण ३६ हजार ९३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी ४८ मतदान केंद्र राहणार आहे. यावर्षी पारंपरिक नामनिर्देशन प्रक्रियेमध्ये बदल करण्यात येवून आॅनलाईन प्रक्रियेचा अवलंब सर्वत्र करण्यात येत आहे. त्यासाठी मास्टर ट्रेनरची विशेष प्रशिक्षणाद्वारे नियुक्ती करण्यात येत असून आॅनलाईन नामनिर्देशनपत्रासाठी इच्छुक उमेदवारांना ते मार्गदर्शन करतील. गरज भासल्यास महाईसेवा केंद्रांचे सहकार्यदेखील घेण्यात येईल. संपूर्ण कागदपत्रांसह फॉर्म भरण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल. कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट उपलब्ध नसणाऱ्या उमेदवारांकडून शपथपत्र भरून घेण्यात येणार आहे. व्हॅलिडीटीसाठीचे प्रस्ताव दाखल केले असल्यास मुख्य जात प्रमाणपत्र कार्यालयाची पोचपावती नामनिर्देशनपत्रासोबत लावावी लागणार आहे. नामनिर्देशनपत्राचे दाखल शुल्क सर्वसाधारणसाठी दान हजार रुपये तर महिला व इतरांसाठी एक हजार रुपये आकारण्यात येणार आहे. अद्ययावत फॉर्म भरून आॅनलाईन केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लॉग आॅन केल्यानंतरच तो ग्राह्य समजण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी स्वतंत्र टेबल राहणार आहे. आदर्श आचारसंहितेवर तहसीलदारांची करडी नजर राहणार आहे. बारा प्रभागांसाठी १२ झोनल आॅफिसर असून त्यांना दोन सहायक राहणार आहे. नेहमीच्या पद्धतीत बदल होवून उमेदवारास जास्तीत जास्त फक्त तीन वेळा मतदान केंद्रावर जाता येईल. या ठिकाणी व्हिडीओ शूटिंग आणि त्याची पाहणी चमू तैनात करण्यात येणार असून सोशल मीडियावरसुद्धा लक्ष राहणार आहे. मतदार जागृती मोहीम राबविण्यात येवून भयमुक्त मतदान प्रक्रियेवर पूर्णपणे फोकस करण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवार व त्याच्या कार्यकर्त्याने आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
३६ हजारांवर मतदार निवडणार २४ नगरसेवक
By admin | Updated: October 24, 2016 01:08 IST