अविनाश साबापुरे / यवतमाळगेल्या १६ वर्षांपासून बिनपगारी काम करीत असलेल्या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील २२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शंभर टक्के पगाराच्या मागणीसाठी यंदाच्या दिवाळीत सहकुटुंब उपोषण करण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतला असून, त्या आधी मंगळवारपासून आठवडाभर राज्यव्यापी अभिनव मोर्चे काढण्यात येणार आहेत.ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना गावातच किंवा गावाजवळच शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने मोठ्या संख्येने उच्च माध्यमिक विद्यालयांना मान्यता प्रदान केली. ही विद्यालये कायम विनाअनुदान तत्त्वावरच सुरू करण्यात आली होती. मात्र, आघाडी शासनाच्या काळात फेब्रुवारी २०१४मध्ये या उच्च माध्यमिक विद्यालयांचा ‘कायम विनाअनुदानित’ हा शब्द वगळण्यात आला. शासनाच्या या निर्णयानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकनही करण्यात आले. विशेष म्हणजे, या मूल्यांकनात ७०० उच्च माध्यमिक विद्यालये पात्र ठरली आहेत. मात्र, मूल्यांकन होऊन दोन वर्षे उलटली, तरीही त्यांना वेतनअनुदान देण्यात आलेले नाही.सतत १६ वर्षांपासून येथील शिक्षक एक रुपयाही पगार न घेता काम करीत आहेत. त्यामुळे आता या उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना १०० टक्के वेतनअनुदान मिळावे, अशी मागणी आहे. त्यासाठीच महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने आता राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंगळवारपासून २५ आॅक्टोबरपर्यंत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
वेतनासाठी २२ हजार शिक्षक आक्रमक
By admin | Updated: October 14, 2016 02:54 IST