सर्वशिक्षा अभियान : उमरखेडच्या उर्दू कन्या शाळेचे बांधकामउमरखेड : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा इमारत बांधकामाच्या नावावर केवळ एक ओटा बांधून तब्बल २२ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविण्याचा अफलातून प्रकार येथे पुढे आला. नगरपरिषदेंतर्गत येणाऱ्या डॉ.इकबाल उर्दू प्राथमिक कन्या शाळेच्या सात वर्गखोल्यांचे बांधकाम यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून हा २२ लाखांचा निधी नेमका गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून वर्गखोल्यांसाठी निधी दिला जातो. उमरखेड नगरपरिषदेंतर्गत असलेल्या डॉ.इकबाल उर्दू प्राथमिक कन्या शाळेच्या वाढीव वर्गखोलीसाठी १ फेब्रुवारी २०१३ रोजी १८ लाख ८५ हजार ७१६ रुपये वर्ग करण्यात आले. त्यानंतर २४ जून २०१३ रोजी तीन लाख १४ हजार २८६ रुपये असे एकूण २२ लाख दोन हजार रुपये बांधकामासाठी वर्ग करण्यात आले. परंतु एवढ्या मोठ्या रकमेत शाळा प्रशासनाने फक्त एका ओट्याचे (बेसमेंट) बांधकाम करून त्यामध्ये सर्व निधी खर्ची घातला. वास्तविक सर्वशिक्षा अभियानांतर्गत एकूण सात वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी सदर निधी वर्ग करण्यात आला होता. शाळेची नियोजित जागा दलदलीच्या ठिकाणी असल्यामुळे त्या जागेच्या दुरुस्तीसाठी प्रचंड खर्च करावा लागल्याचे निमित्त पुढे करण्यात आले आहे. वर्गखोल्या न बांधताच निधी हडपल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाल्यामुळे शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. सदर बांधकामाचे इस्टीमेट तत्कालिन नगर अभियंता गोविंदवार यांनी केले होते. बांधकामास यानंतर बांधकामास निधी अपुरा पडल्याने झालेले बांधकाम ताब्यात घेऊन नगर प्रशासन निधी पुरविणार होते. सदर प्रकरणाची चाहूल लागताच जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी भेट देवून दखल घेतली. परंतु त्यांचे समाधानदेखील शाळा व्यवस्थापनाने केले नसल्याची चर्चा आहे. याबाबत संबंधित मुख्याध्यापिकेला आॅगस्ट महिन्यात कारणेदाखवा नोटीसही बजावल्याचे कळते. सदर मुख्याध्यापिकेने माहितीच्या अधिकारात या बांधकामावर एकूण २६ लाख १० हजार ९६५ रुपये खर्च केल्याचे दाखवून हा प्रकार आणखी संशयास्पद बनविला आहे. ज्याच्या हाती पडेल त्या-त्या संबंधिताने बांधकाम निधीची सर्रास लूट केल्याची खमंग चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकारात शाळा व्यवस्थापन समिती, तत्कालीन मुख्याध्यापिका आणि काही प्रतिष्ठितांचा हात गुंतल्याची चर्चाही सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी नागरिकांतून मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
२२ लाखांत बांधला शाळेचा केवळ ओटा
By admin | Updated: October 19, 2015 00:18 IST