वाचन प्रेरणा दिन : ‘पुस्तक दाना’चा उपक्रमयवतमाळ : मुलांना बालवयातच वाचनाची गोडी लागावी यासाठी १५ आॅक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान १० पुस्तके वाचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्यात या दिवशी २० कोटी पुस्तके वाचली जाणार असल्याची माहिती आहे. वाचन प्रेरणा दिन धडाक्यात साजरा करण्यासाठी जिल्ह्यात सध्या ‘पुस्तक दान’ उपक्रम राबविला जात असून त्याला समाजाकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार १५ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत पुस्तक वाचनाचा उपक्रम राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. वाचन प्रेरणा दिनासाठी प्रत्येक शाळेकडे भरपूर प्रमाणात पुस्तके उपलब्ध असावी, यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर ‘पुस्तक दाना’चा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून याअंतर्गत त्यांनी समाजातील लोकांना शाळांना पुस्तक दान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असून विविध गावांमध्ये शाळांना गावकऱ्यांकडून पुस्तकांचे दान मिळत आहे.वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने प्रत्येक शाळेने ग्रंथदिंडी काढण्याचेही शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. त्यानुसार आपटी, बोटोणी (ता. मारेगाव), दहेगाव यासह विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांनी ग्रंथदिंडी, प्रभातफेरीचा उपक्रम सुरू केला आहे. शिवाय, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी लेखी आवाहनपत्र काढून हजारो मान्यवरांना पाठविले आहे. या आवाहनपत्राला प्रतिसाद देत प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमींकडून पुस्तके दान स्वरुपात मिळत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० छोटी-छोटी (१६ पानी) पुस्तके वाचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक पुस्तके गोळा होण्याची आशा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)प्रत्येक घरातून एक पुस्तकआपटी (ता. मारेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेने काढलेल्या ग्रंथदिंडीला भरघोस प्रतिसाद मिळाला. गावकऱ्यांनी ५ हजार रुपये किमतीची २०० पुस्तके शाळेला दिली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश चामाटे, पांडुरंग फुसे, रामचंद्र बावणे, महादेव कुरेकार, नंदकिशोर घुमडे, दत्तू बावणे, सुनील फुसे, शिक्षक संदीप कोल्हे यांनी ग्रंथदिंडीत सहभागी होऊन स्वत: पुस्तक दानपेटी घेतली. या गावात ११० घरे असून दानपेटीत नागरिकांनी ११० पुस्तके दान केली. तर काही जणांनी पैसेही दिले. गोळा झालेल्या १५०० रुपयांतून ९० पुस्तके खरेदी करण्यात आली.
२० कोटी पुस्तकांचे एकाच दिवशी वाचन
By admin | Updated: October 14, 2016 02:59 IST