दोन दिवस त्रास : नंतर सर्व व्यवहार सुरळीत होणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाची शहरातील पेट्रोल पंपांना भेटयवतमाळ : मंगळवारी मध्यरात्रीपासून केंद्र शासनाने चलनातील ५०० आणि १००० हजारांच्या नोटा अचानक बंद करताच यवतमाळ शहरासह जिल्ह्यात एकाच गोंधळ उडाला. बातमी आली अन् सर्वच एटीएमवर एकच गर्दी उसळली. काहींनी लगेच ५०० व १००० च्या नोटा एटीएमव्दारे भरल्या, तर काहींनी ४०० रूपयापर्यंतची रक्कम काढण्यासाठी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर २ वाजतापर्यंत रांग लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदर्शवरून राष्ट्राला संंबोधित करताना ५०० आणि १००० नोटा बंद करीत असल्याचे जाहीर केले. त्यांनी घोषणा करताच शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँंक चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमवर एकच गर्दी उसळली. तेथे आॅपरेटरही नव्हते. प्रोसेसिंगला वेळ लागत होता. त्यामुळे पैसे काढण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांनी रात्री २ वाजतापर्यंत जागली करावी लागली. पेट्रोल पंपावरही गर्दी उसळली. बुधवारी सकाळपासून पुन्हा पेट्रोल पंपावर गर्दी झाली. प्रत्येक वाहनधारक १००० आणि ५०० ची नोटच देत होता. परिणामी काही वेळातच त्यांच्याकडील चिल्लर पैसे संपल्याने चक्क ग्रहकांमध्येच वादावादी सुरू झाली.पेट्रोल पंपधारकांनी १००० आणि ५०० च्या नोटा घेणे बंद करताच ग्राहकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. लगेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांच्या पथकाने अनेक पेट्रोल पंपांना भेटी दिल्या. नोटा बंद होताच बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतही एकच गोंधळ उडाला. मंगळवारी रात्री ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल विकून या नोटा घेतल्या, त्यांची मोठी पंचाईत झाली. बुधवारी शेतमालाचा लिलाव झाला, मात्र शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही. आता त्यांना पोस्ट डेटेड चेकने पैसे दिले जातील. दरम्यान, मंगळवारपर्यंत बाजार समितीने सर्व खरेदीच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कापूस खरेदीला यामुळे मोठा फटका बसला आहे. मात्र ही स्थिती केवळ दोन ते तीन दिवसच कायम राहणार असून त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होणार आहे. तोपर्यंत दोन दिवस सर्वांनाच कळ सोसावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)
रात्री २ वाजतापर्यंत होती एटीएमवर तोबा गर्दी
By admin | Updated: November 10, 2016 01:42 IST