यवतमाळ : सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना हद्दपार केले जात आहे. उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी पोलिसांच्या २२ प्रस्तावापैकी १९ गुन्हेगारांना या काळात शहरात राहण्यास प्रतिबंध केला आहे. तशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी कारवाया सातत्याने वाढत असून दुबे व दिवटे टोळीत उघडउघड संघर्ष सुरू आहे. खुनाच्या घटना सातत्याने होत आहे. अशा स्थितीत सार्वजनिक सण-उत्सवादरम्यान तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची यादीच तयार केली असून, त्यांना शहरातून हद्दपार करण्याचे प्रस्ताव सादर केले आहे. पहिल्या टप्प्यात फौजदारी कायद्यातील कलम १४४ नुसार २२ जणांना हद्दपार करावे, असा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. यातील १९ जणांना दंडाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून हद्दपारी का करण्यात येऊ नये, असा खुुलासा मागितला आहे. या गुन्हेगारांना १२ ते १८ सप्टेंबर दरम्यान शहरात राहण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याशिवाय शहर पोलिसांनी सात तर वडगाव रोड पोलिसांनी पाच कुख्यात गुन्हेगारांवर मुंबई पोलीस कायद्यातील कलम ५५, ५६ आणि ५७ नुसार दोन वर्ष हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार आहे. या कारवाईमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे ढाबे दणाणले आहे. (कार्यालय प्रतिनिधी) ४कायदेशीर बाबीचा पुरेपूर वापर करीत शहरातील सक्रिय गुंडांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. सणासुदीचे दिवस आणि त्यानंतर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा सुरु आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्ग प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात व्यस्त आहे.
शहरातील १९ गुन्हेगार हद्दपार
By admin | Updated: September 13, 2016 02:14 IST