उमरखेड : पैनगंगा नदीच्या चालगणी घाटातून ट्रेझर बोटच्या साहाय्याने सुरू असलेल्या अमर्याद रेती उपस्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. जिल्हाधिकाऱ्यांनीच आदेश दिल्याने तहसीलचे महसूल अधिकारी चालगणी रेती घाटावर धडकले. त्याठिकाणी ट्रेझर बोटसह सहा ट्रक आणि चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या कारवाईने रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.कोणतीही परवानगी नसताना चालगणी रेती घाटावर ट्रेझर बोटचा वापर करून रेतीचे उत्खनन केले जात होते. येथील तलाठी जी.जी. क्षीरसागर यांनी महिनाभरात चार अहवाल यासंदर्भात उमरखेड तहसीलला पाठविले. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. वाळू उपसा सुरूच होता. याबाबत ‘लोकमत’ने ९ मेच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी चालगणी येथील रेती घाटावर कारवाई करण्याचे आदेश उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांना दिले. या आदेशावरून सिंगला यांनी प्रभारी तहसीलदार राजेश चव्हाण, तलाठी जी.जी. क्षीरसागर, बालाजी भाले, गजानन सुरोशे आणि उमरखेडचे दोन सशस्त्र पोलीस घेवून धाड मारली. मराठवाड्यातील भागातून दुपारी ३ वाजता ही धाड मारण्यात आली. त्यावेळी रेतीचा उपसा सुरूच होता. यावेळी ट्रेझर बोट जप्त करण्यात आली. ट्रेझर बोट मराठवाड्याच्या हद्दीत असल्याने हतगावचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना पाचारण करून जप्तीची कारवाई करण्यात आली, तर सहा ट्रक आणि चार ट्रॅक्टर उमरखेड महसूल विभागाने जप्त केले. एवढी मोठी कारवाई उमरखेड महसूलच्या इतिहासात प्रथमच झाली आहे. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)
ट्रेझर बोटसह १० वाहने जप्त
By admin | Updated: May 10, 2015 01:48 IST