प्रफुल बानगावकर/कारंजा लाड (वाशिम) ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना गावातच किंवा नजीकच्या गावामध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता शासनाकडून कोट्यवधी रुपये ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविण्यासाठी खर्च कण्यात येत आहे; मात्र ग्रामीण भागात नव्याने रुजू पाहत असलेली कॉन्व्हेंट संस्कृती, खासगी शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा, व्यवस्थापन समित्यांची उदासीनता व शिक्षकांचे दुर्लक्ष यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. कारंजा शहर शैक्षणिक क्षेत्रात विदर्भात अग्रेसर मानले जाते. शहरात कोणत्याही संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकले की त्या संस्थेची प्रगती ठरलेलीच असे मानले जाते. पूर्वी येथील नामांकित जे.सी. हायस्कूल व जे.डी. चवरे तथा विद्याभारती महाविद्यालय अशा संस्थेमधील अनेक विद्यार्थी दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत झळकायचे. आता विद्यापीठाने गुणवत्ता याद्या बंद केल्या असल्या तरी शाळेचा शैक्षणिक दर्जा कायम आहे. परिणामी शिक्षण क्षेत्रात कारंजाचे नाव मोठय़ा अदबीने व सन्मानाने घेतल्या जाते; परंतु कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती मात्र याउलट आहे. तालुक्यात एकूण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संख्या १४७ अशी आहे. त्यामध्ये १२ केंद्रप्रमुख व २४ मुख्याध्यापक तथा १0५ पदवीधर शिक्षक व ३४२ सहाय्यक शिक्षक असा एकूण ४८३ पदसंख्येचा ताफा आहे. जि.प. शाळेत १0 हजार ९२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यात अनेक गावांमध्ये नव्याने सुरू झालेल्या खासगी प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूल, कॉन्व्हेंटमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेश घेऊन लागली आहेत, तर ग्रामीण भागातील काही मुले अप-डाऊन करून शहरामध्ये शिक्षण घेऊ लागली आहेत.
जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या रोडावली
By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST