केनवड : केनवड ग्रामपंचायतमध्ये आयोजित महिला ग्रामसभेला संबंधित अधिकारी वर्गच हजर न राहिल्याने व विचारपूस केल्यानंतर उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आक्रमक होवून ग्रामपंचायतला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली.ग्रामपंचायतमध्ये महिला सभेचे आयोजन १४ ऑगस्ट रोजी करण्यात आल्याने व तशी दवंडी दिल्याने गावातील महिला आपआपल्या व गावातील समस्या घेवून हजर झाल्यात. यावेळी सचिव व पंचायत समितीमधून ज्याची सभेसाठी निवड झाली ते कोणीही हजर नव्हते. या ग्रा.पं.चे सचिव यांच्याकडे केनवड व हराळ गावाचा कार्यभार असल्यामुळे ते हराळ येथे आयोजित पुरुष आमसभेला हजर राहिले. मात्र पंचायत समितीने केनवड या ठिकाणी कोणाची निवड केली की नाही केली हे कळू शकले नाही.यावेळी ग्रा.पं. सचिव लोखंडे यांना आपण कोठे आहात याबाबत दुरध्वनीवरुन विचारणा केली असता माझी निवड हराळ ग्रा.पं.आमसभेसाठी असल्यामुळे बिडीओ यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी बिडीओशी संपर्क साधला असता त्यांनी हे आमचे काम नाही गावचे सरपंच याचे काम आहे असे सांगून मोकळे झाले. यामुळे महिलांनी चिडून अखेर ग्रामपंचायतला कुलूप ठोकले . यावेळी गावातील अनेक महिला सहभागी होत्या.
महिलांनी ठोकले ग्रामपंचायतला कुलूप!
By admin | Updated: August 14, 2014 02:06 IST