वाशिम: शासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षेकरिता १0३ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला असून, सोशल मीडियाद्वारे त्याचा गवगवाही मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे; मात्र जिल्हय़ात हा क्रमांकच सुरू नसून, मंगळवारी दुपारी या क्रमांकावर फोन केल्यावर सदर क्रमांक बंद असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आले. घराच्या बाहेर पडताच महिला व मुलींना टवाळखोरांकडून छेडखानीचा सामना करावा लागतो. शाळा- महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थिनी, बस, रेल्वेमध्ये प्रवास करणार्या विद्यार्थिनी तसेच महिलांची छेड काढण्याचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्याकरिता तसेच महिलांविरुद्धचे अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या १0३ या हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. शासनाचे हा क्रमांक सुरू करण्याचे आदेश असले तरी जिल्हय़ात मात्र अद्यापही हा क्रमांक सुरू करण्यात आला नाही. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर संपर्कच होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारचा कोणता क्रमांक आहे, याची माहितीही पोलीस अधिकार्यांना नाही. पोलीस अधीक्षक वगळता अन्य कुणालाही याबाबत माहिती नाही. १0९१ क्रमांकावरही प्रतिसाद नाही जिल्हय़ात पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या सुरक्षेकरिता १0९१ हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे; मात्र या क्रमांकावर संपर्क केला असला त्यावरही प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तसेच सायंकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान या क्रमांकावर संपर्क केला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. हा क्रमांक सुरू करण्यात आला असला तरी याबाबत महिलांनाही माहिती नसून, तक्रारीही कमी प्रमाणात येतात. त्यामुळे पोलिसांनी याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. कारण या क्रमांकावर अद्याप एकही तक्रार प्राप्त झाली नाही.
महिला हेल्पलाइन क्रमांकच नाही!
By admin | Updated: November 25, 2015 02:23 IST