वाशिम : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महा-डीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, अनुदानित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अंतिम मुदतीपर्यंत ३४ हजार १२८ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, यामध्ये सोयाबीनच्या बियाण्यांसाठी सर्वाधिक २८ हजार अर्जांचा समावेश आहे. लक्षांक कमी असल्याने आणि अर्ज जास्त असल्याने अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शीर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, आदी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून, यासाठी शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर सोमवारर्यंत अर्ज करणे बंधनकारक होते. मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी) व ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र, आदी माध्यमातून शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज सादर केले आहेत. अंतिम मुदतीपर्यंत ३४ हजार १२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. लॉटरी पद्धतीतून शेतकऱ्यांची निवड होणार आहे. सोयाबीनसाठी सर्वाधिक जवळपास २८ हजार अर्ज आल्याने अनुदानित बियाणे नेमके कुणाला मिळणार? असा प्रश्न आहे. लॉटरी पद्धतीतून निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश प्राप्त होणार आहे.
००००००००००००
जिल्ह्यातून ३४ हजार अर्ज
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत कृषी विभागाने महा-डीबीटी हे पोर्टल विकसित केले आहे. अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.
कोरोना काळात अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना गैरसोयीला देखील सामोरे जावे लागले. सुरुवातीला १५ मे पर्यंत अर्ज करण्याला मुदत होती. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली.
अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील ३४ हजार १२८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहेत. यामध्ये सोयाबीन बियाण्यांसाठी सर्वाधिक २७ हजार ५९८ अर्ज आले आहेत.
०००००
कोणत्या बियाण्यांसाठी किती अर्ज?
एकूण अर्ज ३४१२८
सोयाबीन २७५९८
तूर ५८८८
मूग ४४७
उडीद १९५
०००००००
सर्वाधिक अर्ज सोयाबीन बियाण्यांसाठी
कृषी विभागाने अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज मागविले होते. त्यामुळे सिंचन साहित्य, यांत्रिकीकरण यासह अन्य योजनांचा उल्लेख अर्जामध्ये करता आला नाही. जिल्ह्यात यंदा सोयाबीनची पेरणी तीन लाख हेक्टरवर होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. त्यानुसार सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. महा-डीबीटी संकेतस्थळावर देखील सर्वाधिक अर्ज अर्थात २७ हजार ५९८ अर्ज हे सोयाबीन बियाण्यासाठी आले आहेत.
००००
अर्ज केलेले शेतकरी म्हणतात...
यंदा अन्य कंपनीच्या बियाण्यांच्या बॅगच्या किमती वाढल्या आहेत. महाबीज आणि अन्य कंपनीच्या बियाण्यांमध्ये ११०० रुपयांचा फरक आहे. त्यातही अनुदानित बियाणे मिळावे याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. अर्जसंख्या पाहता सोयाबीनचे अनुदानित बियाणे मिळणार की नाही याबाबत काहीच सांगता येत नाही.
- बाबूराव वानखेडे, शेतकरी
०००
अनुदानित बियाणे मिळावे याकरिता कृषी विभागाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. सर्वच शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याला पसंती दिल्याने आणि त्या तुलनेत लक्षांक कमी असल्याने अनुदानित बियाणे कुणाला मिळणार? हे लॉटरी पद्धतीवरच अवलंबून राहणार आहे. बियाणे मिळावे, असे प्रत्येकालाच वाटते.
- ज्ञानेश्वर पारिस्कर, शेतकरी.
००००००००००
एसएमएस आला तर ....
अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांची निवड ही पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस प्राप्त होणार आहे. एसएमएस आला म्हणजे निवड झाली की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
०००००
एसएमएस आला तरच मिळणार अनुदानित बियाणे
लॉटरी पद्धतीतून निवड झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना एसएमएस मिळणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादीदेखील लावण्यात येणार आहे. त्यानुसार अनुदानित बियाण्यांचा लाभ निवडपात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
००००