..................
हरभरा काढणीस शेतकऱ्यांकडून वेग
मेडशी : यावर्षी असलेले पोषक वातावरण आणि सिंचनाकरिता मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हरभरा पिकाची जोमाने वाढ झाली. सध्या हे पीक काढून घेण्याची प्रक्रिया सुरू असून त्यास वेग मिळाल्याचे दिसून येत आहे.
................
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे
मालेगाव : गत तीन वर्षांपासून मालेगाव-शिरपूर-रिसोड-सेनगाव-हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण करणे सुरू होते. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे असल्याचे दिसून येत आहे.
....................
बक्षीस वितरण सोहळा ऑनलाईन
वाशिम : स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. ज्योती साळुंखे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला.
...................
आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, १० फेब्रूवारी रोजी पार पडलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शंभरावर रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचारही करण्यात आला.
.............
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
जऊळका रेल्वे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या; मात्र जऊळका रेल्वे स्थानकावर सदर रेल्वे थांबत नाहीत. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करावी, अशी मागणी अतूल कुटे यांनी मंगळवारी केली.
................
थकबाकीदार ग्राहकांवर धडक कारवाई
किन्हीराजा : परिसरातील घरगुती वीज ग्राहकांकडे लाखो रुपयांची विद्युत देयके थकीत आहेत. वारंवार आवाहन करूनही देयके अदा होत नसल्याने अखेर महावितरणने धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.
................
ग्रामपंचायतकडून पाणी टंचाईचे नियोजन
अनसिंग : मार्च महिन्यानंतर पाणीटंचाई जाणवणार असल्याचे गृहीत धरून स्थानिक ग्रामपंचायतीने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने पाणी बचतीचे प्रयत्न केले जात आहेत.
.............
लोखंडी बॅरिकेड्स सोयीचे की गैरसोयीचे?
वाशिम : ‘हार्ट ऑफ सिटी’ म्हणून ओळखला जाणारा पाटणी चौक, रिसोड नाका, पाटणी कॉम्प्लेक्सनजिकच्या रस्त्यावर दुभाजक उभारण्याऐवजी असे लोखंडी बॅरिकेड्स उभे करून देण्यात आले आहेत. या रस्त्यावरून धावणारी मोठी वाहने, एस.टी.बसला यामुळे अडथळा निर्माण होऊन वाहतूक वारंवार विस्कळित होत आहे. बॅरिकेड्सनजिक कचरा साचून रस्ता विद्रूप होत आहे. त्यामुळे ही सोय की गैरसोय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
........................
प्लास्टिक कचऱ्याने गुरांचे आरोग्य धोक्यात
वाशिम : प्लास्टिक पिशव्यांच्या विक्री व वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असताना हा नियम पाळला जात नसून ठिकठिकाणी साचत असलेला प्लास्टिक कचरा सेवनाने मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात सापडत आहे.
..................
आवक घटल्याने ज्वारीचा दर वाढला
वाशिम : जिल्ह्यात संकरित ज्वारीचे लागवड क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे. यामुळे उत्पादन कमी होऊ बाजारात होणारी आवक घटल्याने दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी वाशिम येथे ज्वारीला प्रतिक्विंटल १५०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला.
................
अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष
वाशिम : येथून कनेरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर गत काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत मनीष गोटे यांनी जिल्हा वाहतूक शाखेकडे मंगळवारी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली.