वाशिम: दुर्धर आजारात शासनाकडून १५ हजारांची मदत मिळण्यासाठी १0५ रुग्ण लाभार्थ्यांनी सादर केलेले प्रस्ताव आरोग्य विभागाच्या लालफीतशाहीत अडकल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. २७ जानेवारीनंतर दुर्धर आजारग्रस्तांना मदतीचे धनादेश वितरित केले जात आहेत. नानाविध कारणांमुळे मानवाला विविध प्रकारचे दुर्धर आजार जडत आहेत. गोरगरीब रुग्णांना कर्करोग, हृदयरोग, किडनीचा विकार यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचाराचा खर्च झेपावणारा नसल्याने शासनाने सरकारी दवाखान्यांची सुविधा उपलब्ध केली. याबरोबरच गोरगरीब रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून १५ हजारांचे आर्थिक साहाय्यदेखील दिले जाते. राज्य शासनाने नमूद केलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त रुग्णांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर साधारणत: एका महिन्याच्या आत या प्रस्तावाची पडताळणी आणि मंजुरी या प्रशासकीय बाबी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मार्च ते सप्टेंबर २0१५ या सात महिन्यांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे एकूण १६८ प्रस्ताव प्राप्त झाले. प्राधिकृत दवाखाना नसणे, यापूर्वी लाभ घेणे, दुर्धर आजारात न मोडणे, प्रस्ताव आणि उपचार पत्रकावरील नावात तफावत असणे आदी कारणांमुळे ६३ प्रस्ताव छाननीत बाद झाले. परिणामी, १0५ प्रस्तावांना मंजुरी देऊन दुर्धर आजाराशी संघर्ष करणार्या रुग्णांना १५ हजारांची मदत तातडीने मिळणे अपेक्षित होते; मात्र डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंतही हे प्रस्ताव लालफीतशाहीत ठेवून प्रशासनाने दुर्धर आजारग्रस्तांची जणू थट्टाच मांडली होती. पात्रता यादीत वाशिम तालुक्यातील ३१, मंगरुळपीर १८, मानोरा १७, मालेगाव १६, रिसोड १५ आणि कारंजा तालुक्यातील आठ प्रस्तांवाचा समावेश आहे. दुर्धर आजारग्रस्तांचे सांत्वन करण्याऐवजी प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने दुर्धर आजारग्रस्तांना अर्थसाहाय्यापासून वंचित राहावे लागत होते. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित केले होते तसेच आरोग्य सभापती चक्रधर गोटे, रिसोड पं.स. उपसभापती महादेव ठाकरे यांचा पाठपुरावा आणि २५ जानेवारीला खासदार भावना गवळी यांची जिल्हा प्रशासनाशी चर्चा या सर्वांचा परिपाक म्हणून २७ जानेवारीपासून दुर्धर आजारग्रस्तांना अर्थसाहाय्याचे धनादेश वितरण केले जात आहे.
दुर्धर आजाराच्या रुग्णांचे धनादेश निघाले!
By admin | Updated: February 1, 2016 02:26 IST