वाशिम नगरपरिषद तर्फे काेराेना नियमांचे पालन नागरिकांकडून व्हावे याकरिता ध्वनीक्षेपकाद्वारे दरराेज शहरात जनजागृती केली जात आहे. शहरात गर्दी हाेऊ नये, लाेकांनी मास्कचा वापर करावा यासाठी नियुक्त करण्यात आलेले पथक शहरातील प्रतिष्ठानांसह, रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीने मास्क न घातल्यास त्यांना दंड आकारत आहे. आतापर्यंत लाखाे रुपयांचा दंड नगरपरिषद तर्फे वसूल करण्यात आला आहे. काेराेना नियमांचे पालन न करणाऱ्यांची हयगय न करण्याच्या सूचना नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. नगरपरिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पथकासह कर विभागाचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार , साहेबराव उगले, किशोर हडपकर, संतोष किरळकर, नाजिमोद्दीन खैरोद्दीन मुलाजी, शिवाजी इंगळे, कुणाल कनोजे, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, मुन्नाखान, वहाबभाई आदी परिश्रम घेत आहे.
-----------------------
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय नाही : मुख्याधिकारी माेरे
वाशिम शहरात वाढत असलेले काेराेना बाधितांची संख्या पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अनेक कडक नियम लावल्यानंतरही काही नागरिक या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. तसेच शहरातून दरराेज नगरपरिषद तर्फे ध्वनीक्षेपकाव्दारे वापर करा, गर्दी टाळा, काेराेना नियमांचे पालन करा असे आवाहन केल्या जात आहे. तरी सुद्धा काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने नगरपरिषदे तर्फे पथकांची नियुक्ती करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी सांगितले
-----------
बसस्थानकासमाेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या
बसस्थानकासमाेर माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याने वाशिम नगरपरिषदेतील कर विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना येथे कर्तव्यावर ठेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नगरपरिषद कर विभागातील कर निरीक्षक अजिज यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी लाेकांमध्ये मास्क वापराबाबत, गर्दी टाळण्याबाबत जनजागृती केली. तसेच यावेळी विनामास्क नागरिकांवरही कारवाई करण्यात आली.
--------------
पाेलीस कर्मचाऱ्यांचा अभाव
वाशिम नगरपरिषद तर्फे काेराेना नियमांचे पालन व्हावे याकरिता मुख्याधिकारी दीपक माेरे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. परंतु नियुक्त करण्यात आलेल्या पथकामध्ये पाेलीस कर्मचाऱ्याचा अभाव दिसून आला. एखाद्यावेळी नागरिक व नगरपरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यात वाद झाल्यास पाेलीस कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु पथकासाेबत पाेलीस कर्मचारी दिसून आले नाहीत.