कारंजालाड (वाशिम) : तालुक्यातील उंबर्डाबाजार येथील नवजीवन मेडीकलवर टाकलेल्या धाडीत अन्न व औषधी प्रशासन विभागाने विना परवाना विक्रीसाठी ठेवलेली औषधी जप्त केली आहे. ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या कारवाईत अन्न औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त ए.ह.मेटकर व औषध निरीक्षक स.मो.राठोड, यांनी सहभाग घेतला. या संदर्भात अधिक माहितीनुसार कारंजा शहर व तालुक्यातील काही मेडीकल स्टोअर्सवरुन परवाना नसलेली औषधे विक्रीसाठी उपलब्ध ठेवली जात असल्याची माहिती अन्न औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न औषधी प्रशासन सहाय्यक आयुक्त ए.ह.मेटकर तसेच औषध निरीक्षक स.मो.राठोड यांनी ८ ऑक्टोबर रोजी कारंजा शहर व तालुक्यातील विविध मेडीकल स्टोअर्सची तपासणी केली. या तपासणीत उंबर्डाबाजार येथील नवजीवन मेडीकल स्टोअर्सवर जवळपास ३0 हजार रुपये किमतीची औषधे विनापरवाना विक्रीसाठी ठेवली गेली असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. निदर्शनास आलेल्या प्रकारामुळे अन्नऔषधी प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी नवजीवन मेडीकल सील केले असून या संदर्भात पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती अन्न औषधी प्रशासनाचे औषध निरीक्षक स.मो.राठोड यांनी दिली.
विनापरवाना औषधे जप्त
By admin | Updated: October 11, 2014 01:11 IST