वाशिम : वाशिम जिल्हयातील कारंजा आणि रिसोड तालुक्यातील दोन शेतकर्यांनी सततची नापिकी, तसेच कर्जबाजारीपणामुळे बुधवारी आत्महत्या केली. रिसोड तालुक्यातील ग्राम धोडप येथील ४५ वर्षीय शेतकरी भागवत दत्तात्रय बोरकर यांनी स्वत:च्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन २३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता आत्महत्या केली. बोरकर यांच्याकडे ५ एकर जमीन होती, त्यावर अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७0 हजार रुपयांचे कर्ज होते. याशिवाय त्यांच्यावर सावकारी कर्जही होते. त्यांच्या पश्चात ३ मुली, १ मुलगा, पत्नी आणि मोठा आप्त परिवार आहे. तीन मुलींपैकी १ मुलगी लग्नाची असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मुलीच्या लग्नाची चिंता, सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे या शेतकर्याने आत्महत्या केल्याचे गावकर्यांनी सांगितले. कारंजा तालुक्यातील निंभा जहाँगीर येथील अल्पभूधारक शेतकरी विश्वास गोविंदराव उगले (५५) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. उगले यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती होती. त्यावर सेंट्रल बँक ऑफ ंइंडियाचे १0 हजार रुपयाचे कर्ज होते. यावर्षी त्यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कर्जाची मागणी केली होती; पण त्यांना कर्ज मिळाले नाही. गत दोन ते तीन वर्षापासून शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने आणि बँकेनेही कर्ज नाकारल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. परिस्थितीपुढे हतबल होऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
वाशिम जिल्ह्यात दोन शेतक-यांच्या आत्महत्या
By admin | Updated: September 24, 2015 01:03 IST