मानोरा (जि. वाशिम ) : तालुक्यातील पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधकरण मार्फत राबवत असलेली अठ्ठावीएस गावे पाणीपुरवठा योजना गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील २८ गावांतील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. मानोरा तालुक्यातील अठठाविस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे मुख्य जलकेंद्र असलेल्या अरुणावती प्रकल्पावरून पाणी पुरवठा करणारे दोन्ही मोटारपंप नादुरुस्त झाल्यामुळे योजनेच्या पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या २८ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थ अनेक दिवसांपासून उपसा नसलेल्या विहिरीतील दुषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत आहेत. या दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची लगबग आहे; परंतु पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना ती कामे बाजुला ठेवून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ही २८ गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण उपविभाग कारंजा यांनी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना एक पत्र देवून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे गावकरी उपलब्ध स्त्रोतातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतील त्यामुळे उपलब्ध स्त्रोताच्या पाण्यात आवश्यक प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकुन ते पाणी निर्जंतुक करावे, तसेच हे पाणी उकळून वापरण्याबाबत कर्मचार्यांद्वारे सूचना देण्यात याव्या व तशी दवंडी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली तसेच योजनेचे पाणी येत्या चार ते पाच दिवसात पूर्ववत करण्यात येईल असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे. पत्राची प्रत तहसीलदार मानोरा यांना देण्यात आली आहे.
अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना बंद
By admin | Updated: July 25, 2015 01:36 IST