---------------
शिक्षकांची कोरोना चाचणी अंतिम टप्प्यात
वाशिम: शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. तथापि, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले असताना तांत्रिक कारणांमुळे काही शिक्षकांची कोरोना चाचणी होऊ शकली नाही. आता या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, ९७ टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे.
-------------------
सहा हजार निराधारांची पडताळणी
वाशिम: शासनाच्या सामाजिक अर्थ सहाय्य योजनेतील पात्र, अपात्र लाभार्थींचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. यात मंगरुळपीर तालुक्यात १९ जानेवारीपासून ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेला आता चांगलीच गती आली असून, १० दिवसांत सहा हजार लाभार्थीच्या कागदपत्रांची पडताळणी महसूल विभागाने पूर्ण केली आहे.
----------
जिल्ह्यात ४० हजार क्विंटल कापूस खरेदी
वाशिम: जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला तीन केंद्रात असलेली ही खरेदी आता पाच केंद्रात सुरू असून, २९ जानेवारीपर्यंत या पाचही केंद्रांत मिळून ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी झाल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून शुक्रवारी देण्यात आली.
-------------
दुचाकी घसरून युवक जखमी
वाशिम: मंगरुळपीर-वाशिम दरम्यानच्या महामार्गावर शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मार्गालगत असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी घसरून दुचाकी चालविणाऱ्या युवकास किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने मार्गावर दुसरे वाहन त्यावेळी नसल्याने अनर्थ टळला. मार्गाने जाणाऱ्या चालकांनी या युवकास सावरले. या घटनेची पोलिसांत मात्र नोंद करण्यात आली नाही.